एक स्त्री म्हणून जगतांना..

©® शरयू महाजन.
विणा, हे बघ उद्या नं पाव्हणे यायचेत जेवायला. ह्यांचा जुना मित्र आणि त्याची बायको.
पहिल्यांदाच येताहेत. छान श्रीखंड पुरीचा बेत करुयात.
तेव्हा उद्या थोडी लवकर ये स्वयंपाकाला.-इती सुधा
विणा - लवकर म्हणजे कधी ते सांगा ताई म्हणजे मला घरचं आणि दुसर्‍या कामांचं नियोजन करता येईल.
सुधा - असं कर सकाळी आठलाच ये
विणा - साडेआठला येते.मुलांचा डबा करेस्तोवर तेवढा वेळ होतोच.
सुधाने होकारार्थी मान हलवली आणि विणा निघून गेली.

दुसर्‍या दिवशी विणा सकाळीच आली.
सुधानी सगळंच तिच्यावर सोपवून दिलं. ती गेली पाच वर्षांपासून काम करतेय सुधाकडे. विश्वासूपण.
विणा सुगरण. सगळेच पदार्थ अगदी चविष्ट बनवते.
आज तिने करवंदाचं लोणचं बनवलं.
बाकी सगळा स्वयंपाक होताच साग्रसंगीत.
तेवढ्यात पाव्हणे आले .दिवाणखान्यात बसले.

विणा स्वयंपाक घरात काम करत होती.तिने पाण्याचे ग्लास भरून ट्रे मधे ठेवलेत .
सुधा बाहेर बोलत होती. तिने तिथूनच आवाज दिला, 'विणा पाणी आण ना'
विणाने खोचलेला पदर काढून नेटका केला आणि ती ट्रे हातात घेऊन निघाली.
समोर नजर जाताच मात्र ती दाराच्या आतच थबकली.
आणि माघारी फिरली.
आता ती भांबावून गेली. काय करु आणि काय नको. तिला काही सुचेना.
तिच्या हातातला ट्रे खालीच पडला असता पण तिने डायनिंग टेबलचा आधार घेतला

सुधाने परत आवाज दिला ,'विणा पाणी आण.'
विणाला काही सुचेना तिला तो आवाज ऐकूच आला नाही. तिला भोवळ आली होती.
ती घामाघूम होऊन खाली बसली.
शेवटी सुधाच आत आली आणि समोरचे दृश्य पाहून तिही घाबरली.
तिच्या लक्षातच आले नाही हिला काय झाले. आता तर ही व्यवस्थित होती.एकाएकी असे काय झाले ?तिही घाबरली आणि तिने नवर्‍याला आवाज दिला.

तोच विणा म्हणाली,' अहं नको नको आवाज नका देऊ. मी उठते.पण तिला जमेना.
ती म्हणाली,' ताई तेवढा पाण्याचा ट्रे तुम्ही घेऊन जा.'
सुधा पाणी देऊन आली पण हिला उठणे जमेना.
मोठ्या बळजबरीने ती उठली पण तिला वाटत होतं पुर्ण घर फिरतेय.
ती सुधाला म्हणाली,' ताई आजच्या दिवस तेवढं तुम्हीच वाढून घ्या.मला चक्कर येतेय .मी आतल्या रुममधे पडू का ?

सुधा म्हणाली,'अगं विचारायचं काय जा पड थोडी मी साखरपाणी आणते.'
विणा आत जाऊन डोळे मिटून पडली.
तर त्या मित्राची बायको निता आत आली. आता सुधा आणि निता दोघींच्या गप्पा सुरू.
सुधा सांगत होती,'परिस्थिती मोठी वाईट असते. काय हो तिची नाजुक तब्येत पण दोन मुलं आणि म्हातारे सासुसासरे एकटीने सांभाळायचे तर दिवसभर राबते बिचारी. आज सकाळीच आली पोटात काही नसेल.'

इकडे विणाची अस्वस्थता अजून वाढत होती.यांनी माझ्या विषयी अजून काही सांगू नये.
त्या मित्राने म्हणजे रमेशने आत येऊ नये. तिला धास्तीच. त्यामुळे ती अधिकच अस्वस्थ झाली. तेवढ्यात
रमेशचे शब्द तिच्या कानावर पडले.
'टाॅयलेट कुठे आहे ?'
तो आवाज ऐकून विणा लगेच उठली आणि सुधाला म्हणाली,' मी घरी जाऊन आराम करते.'
तिने त्याची टॉयलेटला जाण्याची वेळ साधली आणि भरकन् निघाली.

पण...तरी...
रमेशला बाहेर निघता निघता ती ओझरती पाठमोरी दिसलीच.
आता रमेश विचलित झाला. कारण सुधाने दिलेला आवाज विणा विणा... ऐकूनच तो भूतकाळात गेला होता.
कारण हेच नाव पाच वर्ष पुर्वीपर्यंत त्याच्या मुखात सारखे रहायचे. आता तिला बघून तर शिक्कामोर्तबच झाले होते की विणा खूप असल्यातरी ही 'तिच' विणा आहे.
त्याच्या हातून पाण्याचा भरलेला ग्लास खाली पडला. तो कावराबावरा झालेला बघून सुरेश म्हणाला,' असू दे असू दे'

नंतर ते चौघेही डायनिंग टेबलवर जेवायला बसले. पण रमेशचे जेवणातले लक्षच उडालेले.
सुरेश-सुधा आग्रह करत होते पण त्याला काही धकतच नव्हते.
निता त्याला म्हणाली, "अहो लक्ष कुठाय ?तुम्हाला वहिनी काय विचारताहेत .
बरं नाही वाटत का ? एकदम असे शांत शांत का झाले ?"
सुरेश - हो ना आत्ता तर किती बडबड करत होतास एकदम असा गप्प का ?
निता - का बरं काही होतय कां ?
रमेश- थोडं अस्वस्थ वाटतय.
सुरेश- थांब आमच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करतो.
रमेश- नको नको मी आता घरीच निघतो .आराम केला की बरे वाटेल.

या गडबडीत कोणीच व्यवस्थित जेवले नाही.
पण रमेशने तेवढ्या अस्वस्थतेतही सुधाला करवंदाचे लोणचे मात्र डबीत भरून मागितले.
रमेश-निता निघून गेले.
पण सुधाच्या विचारचक्राला चालना देऊन गेले.
दुसर्‍या दिवशी सुधाने विणाची चौकशी केली.
"बरे आहे का ?कामाला येते की नाही ?"
तर विणा म्हणाली, 'ताई तुम्ही दुसरी बाई शोधा.मला नाही जमणार. '


सुधा चक्रावलीच. हे काय आता.
"अगं विणा ते नंतर बघू.आधी तुला बरे आहे का ते सांग."
विणा - हो ताई, बरे आहे.पण...
सुधा - अगं पण काय ? मला भेटायला तर ये कमीत कमी.मग बोलु आपण.असं एकाएकी काय झालं की तू माझं घरच सोडून द्यावं.
पण आठ दिवस लोटले तरी विणा आलीच नाही. तिने एकाएकी काम सोडल्यामुळे सुधालाही दुसरी बाई मिळेपर्यंत हाताने करणे आले.
तिने परत विणाला फोन लावला ,' पैसे घ्यायला पण येणार नाही का ?'

सुधाच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकत होती.
विणाला पैशाची अडचण जाणवली तेव्हा ती पैशासाठी म्हणून आली.
त्यावेळी ती निघायची खूप घाई करत होती. पण सुधाने पैसे द्यायला मुद्दाम उशीर लावला आणि हळूच तिच्या अंतरंगात शिरली.
सुधा तिला चांगली ओळखत होती. गेल्या पाच वर्षांपासून ती संपर्कात होती तिच्या.
तिने हक्काने विणाला म्हटले, "विणा अगं मालकीण, कामवाली हे नातं आपण कधीच विसरलो गं.आपण इतक्या जिवाभावाच्या मैत्रीणी कधी झालो ते कळलेच नाही.मी काही दुखते म्हटले की काम सोडून पटकन् बाम लावून देणारी तू .

मी माझं मन तुझ्याकडेच मोकळे करायचे आणि तू पण.
इतकं सख्य झालं गं आपल्या दोघीत. आणि हे काय असं एकाएकी तू ...
तुला जड नाही गेलं नाही म्हणतांना ? मलाही कळू दे माझ्याकडून काय चुक घडली ?तुला कुठे दुखावले गेले ?"
विणाही विचार करु लागली आपल्या अडीअडचणीला प्रत्येक वेळी मदत कधी परतफेडीची अपेक्षा नाही. दुखलं खुपलं तर केवढा आधार.
ती पटकन म्हणाली येते उद्यापासून.
सुधा - उद्या कधी उगवत नसतो.आजपासून.
अन् विणा कामाला लागलीपण.

तिला घरातलं सगळंच माहित असल्यामुळे ती सरावाने भरभर सगळं आवरु लागली.
सुधाला कामाचा थकवा होता.तिला पडल्या पडल्या डोळा लागला.
तेवढ्यात बेल वाजली. सुधाही बाहेर आली तोवर विणाने दार उघडले.
दारात....रमेश...
पण आता विणा विचलित नाही झाली. ती निग्रही झाली. चला आता संधी मिळालीच आहे तर ...
तो घरात येऊन बसला .आज एकटाच होता.

आज पाणी विणानेच दिले. मनात म्हणत होती थांब चांगली पाणी पाजते किनई ते बघ.
सुरेश बाहेरगावी गेलेला. सुधा त्याच्याशी बोलत होती. विणाला चहा करायला सांगितला.
विणा चहा घेऊन आली आणि सोफ्यावर बसली.
विणा - हं...काय मग मिस्टर रमेश कसे आहात ? म्हणजे... खूप खूष असाल ?
सुधा विणाकडे आश्चर्यमिश्रीत थोडी रागाने बघतच होती पण तिने रमेशच्या चेहर्‍यावरचे भाव टिपले तो खूपच ओशाळलेला होता.

विणा - ताई तुम्हाला वाटेल ही अशी कशी बोलतेय?काही मॅनर्स ?
पण तुम्हीही मला गेली पाच वर्षांपासून ओळखता.
ताई जो माणूस बायको तर सोडा आईवडील, लेकरांना वार्‍यावर सोडून स्वतःचा नवीन संसार थाटून ऐयाशीत जगतो तो खूषच असणार नं ?
सुधा - विणा काय बोलतेस तू हे ?तू ह्यांना ओळखते ?
रमेश - वहिनी हो . मी पापी आहे ,दुष्ट आहे .पण त्या दिवशी हिला इथे बघितले म्हणूनच न राहवून आज आलो .मुद्दामच एकटा. त्याच आशेवर की ही इथे मिळेल. आपण क्षमा मागू.

विणा - व्वा! क्षमा...? माझी काय मागता त्या जन्मदात्या मायबापाची मागा. रात्रंदिवस वाटेकडे डोळे लावून बसलेत बिचारे .आज तरी येईल माझं लेकरु म्हणून. त्या लेकरांची मागा ज्यांचं उभं जीवन होरपळलंय.
सुधा - रमेश काय ऐकतेय मी हे ? का केलंत असं ? का असे निष्ठूर वागलात ? नुसती क्षमा मागून संपेल का हो हे सगळं?
रमेश - वहिनी....मी फार मोठी चूक केली आयुष्यात....पण अजून ही वेळ गेली नाही कारण....
विणा - मला घराबाहेर काढायचे होते त्यांना. मी निघाले नाही तर सगळी जबाबदारी माझ्यावर ढकलून स्वतः पोबारा केला आज पाच वर्ष झालीत ढुंकून तरी बघितलं का आपले मायबाप जिवंत आहे की गेले ?आपली मुलं काय खातात कसे रहातात ?स्वतः मात्र...
आता विणाला एकदम हुंदका आला.

सुधा- रमेश निताला हे सगळं माहित आहे ?
रमेश - नाही. मी तिला मला आईवडील नाहीत आणि माझे लग्न पण झालेले नाही म्हणून खोटेच सांगितले. कारण ती फार सभ्य मुलगी आहे. ती माझ्या ऑफिसमधे होती मीच भाळलो तिच्या रुपगुणांवर.
पण तिने पहिले चौकशी केली. कदाचित खरे सांगितले असते तर ती तयारच झाली नसती.
सुधा - आत्ता तुम्ही काय म्हणालात, 'अजून वेळ गेली नाही...म्हणजे मी समजली नाही.
रमेश - आम्ही अजूनही लिव्ह इन रिलेशनशीप मधेच राहतो. लग्न केलेले नाही.

सुधा - म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे रमेश....आता तिला सोडून विणाकडे...
म्हणजे तिला वार्‍यावर सोडणार?काय बोलताय तुम्ही. तुमचं तुम्हाला तरी कळतय कां ?
तेवढ्यात सुरेशही आलेला. सगळं ऐकून तो तर थंडाच झाला.
पण सुरेशने फोन करून निताला बोलवून घेतले.
सुधाने निताला परिस्थिती समजून सांगितली.
कारण विणाजवळचे पैसे, घरातली खाद्यसामग्री तीनचार महिन्यात संपली.

आता घरातले एक एक सामान विकणे सुरु झाले आणि गावातल्या लांडग्यांच्या नजरा ?त्याचा सामना करणे तिच्यासाठी कठीण. शेवटी घर सोडले, गाव सोडले.कुठे जायचे माहित नाही अशात पुण्यात आली.
पहिले सहा महिने तर तिने रेल्वे फलाटावर काढले. आता एक टिनपत्र्याच्या खोलीत सगळ्यांना घेऊन रहात होती.
आता चार घरची कामं करून एकवेळचे का होईना जेवण त्यांना मिळते. मुलांना शिकवतांना फेस येतोय बिचारीच्या तोंडाला.
निता सगळं ऐकून दिग्मुढ झाली. ती नोकरीत स्थिरस्थावर झालेली.


ती विणाच्या गळ्यात पडून खूप रडली. 
"मी तुमचा संसार उध्वस्त केला.
पण ताई मी दोषी नाही हो मला ह्याने अंधारात ठेवले. पण...आता मला घृणा येतेय.
रमेश तुम्ही माणुसकीला काळिमा फासलाय रमेश काळीमा फासलाय."
ताई मी तुम्हाला वचन देते म्हणत तिने विणाचा हात हाती घेतला आणि ती विणाला घेऊन रमेशकडे गेली त्याचा हात विणाच्या हाती देत म्हणाली,' यानंतर तुम्हा दोघांच्या संसारातून मी दूर जातेय...'

एक स्त्री दुसर्‍या एका स्त्रीवर अत्याचार नाही करु शकत. मी तिच्या जागी मला स्वतःला ठेवून बघितले तेव्हा हा निर्णय घेतेय आणि तो अंतीम असेल म्हणत ती निघाली सुद्धा.
विणा बघतच राहिली.
रमेश मात्र पश्चात्तापदग्ध अवस्थेत बघत होता. 
'मी अपराधी आहे. मी निताचाही अपराधी आहे.एका सात्विक मुलीला मी फसवले.
मी नतमस्तक आहे तिच्या सत्शीलतेसमोर. किती सहज दूर झाली ती.

आणि...विणा तू...तुला दूर लोटले तरी माझ्या आईवडीलांचा सांभाळ केला.काय परिस्थिती लादली गं मी तुमच्यावर.
विणा तू तरी मला स्विकारशील ?'
म्हणत रमेश ढसाढसा रडत होता.
निता तर दूर निघून गेली होती.
विणा - मी नाकारलंच नव्हतं तर स्विकारण्याचा प्रश्नच कुठे येतो ?
पण रमेश एक लक्षात ठेवा ,'फाटलेल्या वस्त्राला ठिगळ लावलं की ते दिसतंच.प्रत्येक वेळी वापरतांना आपलंही लक्ष जातं आणि इतरांचंही जातं. आणि लावलेलं ठिगळ आपल्याकडे बघून हसत असतं ,'मी झाकलं गं छिद्र... डाग....
गर्व तर मी करायला पाहिजे वापरताना जाणिव ठेव.'


प्रत्येक वेळी ते वस्त्र आठवण करून देते.
रमेश आपल्या संसार वस्त्राचं छिद्र निताने झाकलंय.
ती जरी सहज दूर झाली असं तुला वाटतंय तरी आपण तिच्यावर अन्याय करतोय. मी पण तिच्याजागी मला ठेवून बघितले. आज तिचं आयुष्य उजाड झाले. स्त्री म्हणजे 'युज अॅन्ड थ्रो' वाली वस्तु वाटली का तुला ?
ती जर वाईट प्रवृत्तीची असती , सर्व परिस्थिती माहित असूनही ती जर तुझ्या समवेत राहिली असती, एक संसार उध्वस्त होतांना तिने उघड्या डोळ्यांनी पाहिला असता, एक स्त्री असूनही मुलांचे हाल तिचे हृदय हलवू शकले नसते तर मीही म्हटले असते तिच्या चुकीची शिक्षा तिला भोगु दे.भोगायलाच हवे आपल्या दुष्कृत्याचे फळ.


पण आज एका सुशील स्त्रीचं जीवन मातीमोल होईल. तू याचं प्रक्षालन कसं करणार ?
माझं डोकं बधीर झालंय.ती माझ्यावरचा अन्याय बघु शकली नाही .मी तिच्यावरचा अन्याय बघु शकत नाही.रमेश तिला बोलाव. मला बोलायचे आहे.
निता आली. 
विणाने तिच्यासमोर दुसर्‍या लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण ती तयार झाली नाही. तिने मनाची तयारी केली होती की आता परत या दलदलीत फसायचे नाही.उलट अशा पिडीतांसाठी सहारा बनायचे.

विणानेही रमेशला सांगितले ,'आपलाही वैवाहिक संबंध संपला. आता फक्त कर्तव्य पूर्तीसाठी आईवडील, मुलांसाठी मी सोबत राहिल.वाटल्यास ही तुझ्या दुष्कृत्याची शिक्षा समज.'
रमेश विचार करत होता ,'अब पछताए होत क्या जब चिडीया चुग गयी खेत'
पण त्याला पश्चात्ताप होता मी हे काय करुन बसलो ?
पण विणा आणि निताने मिळून मात्र एक आदर्श प्रस्थापित केला होता की अशा पुरुषी मनोवृत्तीला ठेचायचे.आणि आपल्या स्त्रीत्वाचा आपणच सन्मान करायचा.स्त्रीनेच स्त्रीचे शत्रु बनू नये .पुरुष त्याचा फायदा उचलतात.
असे परत घडू नये म्हणून आपणच कृतसंकल्पीत व्हायचे.
समाप्त.
©® शरयू महाजन

सदर कथा लेखिका शरयू महाजन यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

धन्यवाद.!!!

📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने