हरवलेलं सुख


©® सौ. प्रतिभा परांजपे.

सुनंदाबाई आश्रमात पोहोचल्या, तेव्हा नऊ वाजले होते. लहान मुलांचे खाणेपिणे झाले कि त्यांना बागेत खेळायला पाठवत असत. मुलांबरोबर एक आया असायची.

सुनंदाबाई रोजच येत असत, मुले ही त्यांच्या येण्याची वाट पाहत. त्या त्यांच्याबरोबर लपाछपी खेळायच्या ,मुलं थकलिशी वाटली की ‘आता गोष्ट सांगते’ म्हणून सर्वांबरोबर खाली बसत .

त्यांना आलेली पाहून आया दुसऱ्या कामाला निघून जात असे.

सर्वांना खाली बसवून त्या रामायण ,महाभारत किंवा इतर गोष्टी रंगवून सांगत व दुसरे दिवशी त्यावर प्रश्न विचारी, कधी त्यांना इंग्रजीचे शब्द, फळांची फुलांची, पशु पक्षांची माहिती देत . 
शाळकरी मुलें त्यांच्या कडून गणित, इंग्रजी शिकत, कधी त्यांच्यासाठी त्या खाऊ आणत!

मुलं त्यांच्याबरोबर आनंदात असत आणि त्याही मुलांसोबत आपलं वय विसरून खेळत .
आज त्यांनी मुलांना श्रवण बाळाची कथा व कविता शिकवली. 
मुलं अगदी तल्लीन होऊन ऐकत होती. गोष्ट ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले .

हे सर्व खिडकीतून आत ऑफिसमध्ये बसलेल्या प्रकाश साहेबांना दिसत असे.
ते या आश्रमाचे व्यवस्थापक होते , त्यांना सुनंदाबाईंच्या उत्साहाचे खूप कौतुक वाटे. बाई साठ च्या वयाची पण उत्साह मात्र लहान मुलांप्रमाणे. आपले वय विसरून मुलांमध्ये रमणार्‍या.

एक दिवस त्यांनी सुनंदा बाईंना विचारले, "कसे काय तुम्हाला जमते मुलांबरोबर मूल होऊन वागायचे? तुम्ही लहानपणापासून अशाच खेळकर वृत्तीच्या असाल असे वाटते."
सुनंदाबाई फक्त हसल्या बोलल्या काहीच नाही.

दुपारी घरी जाऊन जेवल्यावर जरा वेळ पडून राहायची त्यांना सवय होती, थोडा बहुत डोळाही लागत असे. 
तेही आवश्यकच होते या वयाला.
पडल्या पडल्या त्यांना प्रकाश साहेबांचं बोलणं आठवले.
लहानपणी खरच आपण कशा होतो बरं? बालपणी च्या आठवणी मनात फेर धरून नाचू लागल्या.
तीन भावंडां मध्ये सगळ्यात मोठी सुनंदा, बाबांची खूप लाडकी होती. 
बाबा नेहमी म्हणायचे, 'माझी नंदा मोठी होऊन नांव काढेल.' 

पण –सर्व मनासारखं घडलं तर ?
बाबांना धंद्यात खूप मोठा फटका बसला , घराची सगळी घडीच विस्कटली. बाबांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला आणि एक दिवस ते कुठेतरी निघून गेले ते परत आलेच नाही .
सुनंदा तेव्हा पांचवीत होती ,अभ्यासात हुशार. पाठीमागची तीन भावंड व आई. आई घर काम करून कुठे कुठे स्वैपाकाचे काम करू लागली.
पण आधी एशो-आरामाची शरीराला सवय त्या मुळे काम झेपेना,आई वारंवार आजारी पडू लागली.

दहावी पास होताच सुनंदाने अभ्यासा बरोबरच नोकरी शोधली. पाठची भावंड ही शिकत होती.
काळ कोणासाठी थांबतो ?
पण या सगळ्यातच सुनंदाचे बालपण हरवले ,लहान वयातच प्रगल्भ झाली. नोकरी करता करता बी‌.ए झाली, टायपिंग शिकली. आता घरात थोडी स्थिरता आली.
दोघी बहिणी व भाऊ पण शिकत शिकत मोठे झाले व आपल्या आपल्या मार्गी लागले.

कालांतराने आई पण गेली, आणि सुनंदाला एकटे पण जाणवू लागले.
बहिणी व भाऊ तिचं लक्ष ठेवत असत पण तरीही आपला हक्काचं कोणी असाव असं तिला नेहमी वाटे .

अशाच मनस्थितीत असताना ऑफिसमधल्या राजन ने तिला लग्नाचे विचारले. 
राजन ची पहिली पत्नी दोन वर्षांपूर्वीच निर्वतली होती. आठ ते दहा वर्षाची दोन मुलं होती. आता सुनंदालाही या वयात आणखीन चांगले स्थळ काय मिळणार, असा विचार करून तिने होकार दिला.

सुरुवातीचे काही दिवस मुलांना समजुन घेण्यात गेले, सुनंदाचे ऑफिस, मुलांच्या शाळा घर काम हे सगळं मार्गी लावायला तिला वेळ हवा म्हणून काही दिवस तिने सुट्टी ही घेतली.

मुलांच्या उठायच्या झोपायच्या वेळा फार विचित्र होत्या, त्यांना टीव्ही, मोबाईल ची सवय.तिने त्यांना प्रेमाने समजून सांगायचा बराच प्रयत्न केला पण मुलांना तिच सांगणं पटत नसे. 
‘आमची आई असे नसे करत, ती खूप छान होती!’ असे तिला वारंवार ऐकवत.
लवकरच तिच्या लक्षात आलं मुलांना तिची फारशी गरज नव्हती.
त्यांच्या मनात असलेली आईची प्रतिमा इतकी पक्की होती कि,ते सुनंदाला आई मानायला तयारच नव्हते.

सुनंदा ने हर तर्‍हेने प्रयत्न केले, पण दोघे मुलं अंतर राखूनच वागत‌ मग तिने प्रयत्न करणे सोडून दिले. 
स्वतःचे मुल होण्याचे वय ही उरले नव्हते, त्यामुळे मातृत्वाची ती इच्छाही राहिली‌.

मुलं दत्तक घ्यावे असे तिला वाटे, पण राजनला त्याची ही गरज नव्हती. 
तिच्या भावना, इच्छा, यांना त्यांच्या लेखी काहीच किंमत नव्हती.. तो ‘तुला मुलांच्या कलाने घेता येत नाही’, असे वारंवार ऐकवत असे

मुलां मध्ये आणि तिच्यामध्ये असलेले अंतर पाहून मग राजन ही तिच्याकडे फारसे लक्ष देत नव्हता, ती फक्त नावालाच त्याची बायको होती ‌. सुट्टी चा त्याचा सगळा वेळ मित्रांबरोबर फिरण्यात आणि पार्ट्यांमधे जात असे. सुनंदा ला जणू घर सांभाळायला ठेवलेली बाई असल्याचे फील येई.

कालांतराने मुलांचे शिक्षण पार पडले व नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेली. पुढे मुलांची लग्न पार पडली. 
राजन ही तिकडे जाऊन येऊन असायचा. 
सुनंदाला नेहमी वाटायचं राजनने तिला बरोबर न्यावे, पण त्याने कधीच फारसा आग्रह केला नाही.
आता राजन जास्त च जास्त मुलांकडे राहू लागले. त्यांनी लवकरच रिटायरमेंट घेतले पण सुनंदाची नोकरी होती. सुनंदा ला निवृत्ती नंतर वेळ घालवायला काय करावे असा विचार अलिकडे सारखा मनात येऊ लागला.

एक दिवस आफिस मधील एका नवीन एम्प्लॉई कडून पार्टीच बोलवण होते. तिने सुनंदा व इतर मैत्रिणींना बाल आश्रमात नेले. 
तिथे अनेक मुलं होती त्यांच्या सोबत राहून सुनंदाला खूप बरं वाटल़़ं. 
लहान लहान मुले आईबापांच्या प्रेमाला पारखी आणि इकडे ती स्वतःच्या बाळासाठी आसुसलेली होती. 
कोणीतरी आपल्याला आई म्हणावे असे तिला सारखे वाटे‌. ‌

पुढे सुनंदा ही नौकरी तून निवृत्त झाली, थोडे दिवस भावा बहिणींच्या घरीफिरुन राहून ही आली. 
पण शेवटी आपलं घर ते च आपलंच, असे वाटून परत आली,अताशा राजन मुलांसोबत रहात होते. 

आता काय करायचं ह्या विचाराअंती ती बाल आश्रमात येऊ लागली. 
तिथली ती निरागस बाळं तिला आपली वाटत. 
ती अजाण पोरं ,कोणी तिला मावशी तर कोणी सुनंदा आई म्हणत. त्यांच्या बरोबर तिचा वेळ छान जात असे.

असेच दिवस जात होते आणि एक दिवस मुलांनी राजन गेल्याचं कळवलं. 
त्या वेळीं ती मुलांकडे गेली. तिथे त्याचे दिवसवार करुन परत आली.
अशा तर्हेने तो एक पाश ही तुटला.आता ती अगदीच एकटी पडली.
अचानक फोन च्या आवाजाने ती भानावर आली फोन तिच्या धाकट्या बहिणीचा होता.
‘ताई खूप दिवस झाले तुझा फोन नाही? कशी आहेस,’

‘मी बरी आहे ग ,तू ये ना इकडे.’
पण बहिणी ला तिच्या संसारातून काही वेळ मिळत नव्हता,
‘अगं ताई, तूच ये’ असा तिनं आग्रह केला.
"पहाते.. " म्हणत सुनंदाने वेळ निभावून नेली.
खरं तर आता आश्रम आणि तिथली मुलं ह्यानेच तिला बांधून ठेवले होते तोच तिच्या जगण्याचा आधार होता.

असाच काळ पुढे सरकत होता आणि एक दिवस एक तान्ही मुलगी आश्रमात कुणी तरी सोडून गेलं.
लहानसा जीव, त्याला पाहून सुनंदा च्या मनाला पाझर फुटला.
तिला मांडी वर घेत पदरा खाली घेऊन ती आई पण अनुभवायचा प्रयत्न करू लागली.
लहानस मुल, पण तिलाही प्रेम वात्सल्य बरोबर समजायचं. सुनंदा ने तिचे नाव छकुली ठेवलं,
छकुली म्हणून हांक मारताच ती पण हुंकार देत असे, ती पण आईच्या मायेने तिच करायची अशा तऱ्हेने  आयुष्यातले निसटलेले क्षण, आपली मातृत्वाची भूक व हरवलेले बालपण तिला इथे मिळू लागले. 
व ती इथे रमायला लागली. 

आता सुनंदालाही छकुली चा लळा लागला.
कधीतरी कोणी पालक मुल दत्तक घ्यायला यायचे.
पूर्वी असे पालक आले की सुनंदा ला समाधान वाटायचं चला ह्यातल्या कोणाला तरी चांगले आयुष्य लाभेल. पण आता ती छकुलीला येणार्‍या पालकांच्या नजरे समोर न येऊ देण्या चा प्रयत्न करू लागली.
आता तिला घरी जाणे ही नको वाटे.

काल संध्याकाळ पासुन सुनंदा ला अंगात कसर असल्याने सकाळी उठावेसे वाटत नव्हते, पण छकुली च्या ओढीने ती औषधं घेऊन आश्रमात गेली. 
छकुली रडत होती सुनंदाबाईंना पाहून छकुलीचं रडणं थांबलं व सुनंदाला ही बर वाटलं..
संध्याकाळी सुनंदाबाईंना प्रकाश साहेबांनी आफिस मधे बोलावले.
तब्येतीची चौकशी वगैरे करून त्यांनी दोन दिवस आराम करा असेही सुचवले.

दोन दिवस खरोखरच सुनंदा ला बर नव्हते. तिने बहिणी ला फोन करून बोलावून घेतले.
बहिण आली तिने सुनंदा च औषध पाणी केलं. 
दोन दिवसांनी सुनंदा बाईंचा ताप उतरला पण अशक्तपणा आला होता तरिही त्या आश्रमात जायला तयार झालेल्या पाहून बहिण म्हणाली ‘अगं ताई तिथले कर्मचारी आहेत न त्या बाळाच्या संगोपनासाठी.’

‘हो ते आहेत ते इतर मुलांसाठी, पण माझ्या छकुलीला माझ्याशिवाय नाही करमत आणि मला सुद्धा तिची सारखी आठवण येते.’

‘ताई आता या वयात का उगाच अडकून पडते आहे. विरंगुळा म्हणून तू आश्रमात जाते ते ठीक आहे, पण आता कुठल्याहीनव्या नात्यात उगाच जीव गुंतवू नको.’ बहिणीने समजवून पाहिले.
सुनंदाबाईंना बहिणीचे म्हणणे समजत होते पण मन मनाला तयार नव्हतं. 
सारखी छकुलीची आठवण येत होती. दुसऱ्या दिवशी त्या आश्रमात पोहोचल्या.

प्रकाश साहेबांनी त्यांना ऑफिसमध्ये बोलावले. 
‘या सुनंदाबाई तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आपल्या छकुली करता एक पालक आले होते त्यांना छकुलीला दत्तक घ्यायचे आहे.’ हे ऐकून सुनंदाबाईंचा जीव घाबरा झाला काही न बोलताच त्यांनीछकुली कडे धाव घेतली.
दुसऱ्या दिवशी सुनंदाबाई लवकरच आश्रमात पोहोचल्या तिथे एक कुटुंब, नवरा बायको हजर होते.

त्यांनी सुनंदाबाईंना छकुली बद्दल विचारले आणि म्हणाले ‘आम्ही छकुलीला दत्तक घ्यायचा विचार करतो आहे तुम्हाला काही हरकत तर नाही ना? तुम्ही तिच खूप प्रेमाने संगोपन करता, पण पालक म्हणून आम्ही तिला आई बाबा दोघांचे प्रेम देऊ. जरी ती आमची मुलगी झाली तरी तुमचाही तिच्यावर हक्क राहील.’

सुनंदाबाई त्यावर काहीच बोलल्या नाही त्यांचे मन उदास झाले. 
त्या ऑफिसमध्ये उदास होऊन बसल्या ते पाहून प्रकाश साहेब म्हणाले ‘बघा बाई तुमचं छकुली वर खूप प्रेम आहे. पण या वयामध्ये तुम्ही तिची काळजी नीटपणे घेऊ शकाल का याचा नीट विचार करा शिवाय तुम्ही तिला दत्तक घेऊ शकणार नाही. मग जर तिला एक चांगले पालक, उत्तम परिवार मिळत असेल तर ?’

प्रकाश साहेबांचे बोलणे सुनंदाबाईंना पटले. 
त्यांनी विचार केला, 'माझ्या या शरीराचा काय भरोसा? आज आहे, उद्या नाही ! जर माझ्या छकुलीला माझ्या डोळ्यासमोरच प्रेम करणारे आई बाप मिळत असले तर, मी आपल्या स्वार्थासाठी का तिला बांधून ठेवावे?' 
विचारांती त्यांनी प्रकाश साहेबांना होकार दिला.

दोन दिवसांनी छकुलीला न्यायला तिचे नवीन आई बाबा आले. निघताना त्या सुनंदा बाईंकडे पाहून म्हणाल्या ‘छकुली, आजीला म्हणा मला विसरू नको. घरी ये माझ्या रोज भेटायला.’
आजी हे शब्द ऐकून सुनंदाबाईंना वाटले की त्याचे हरवलेल सुख त्यांना दुप्पटीने परत मिळाले.
समाप्त.
©® सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

धन्यवाद.!!!

📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.Post a Comment

थोडे नवीन जरा जुने