उसनी माया

©® दिलीप अपशंकर.

रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये विवाहपत्रांवर सही करून आणि एकमेकांच्या गळ्यात हार घालून आरव आणि आराध्या घाईघाईने बाहेर पडले. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून आजचा दिवस मोकळा ठेवणे त्यांना भाग होते. 
नवीन संसाराच्या खरेदीची अजून बरीच कामे बाकी होती. परंतु त्याआधी दोघेही आजी आजोबांचे आशीर्वाद घ्यायला गेले. 
आरवच्या आई-वडिलांच्या अपघाती निधनानंतर त्याचा सांभाळ आजी-आजोबांनीच केला होता. आजीच्या मायेनेच त्याला लहानाचे मोठे केले होते. 
त्यामुळे आरवसाठी आजी-आजोबाच सर्वस्व होते. “सुखी व्हा!” आजीने आशीर्वाद दिला. 

“त्या भीषण अपघातामुळे आपला वंश मधेच खुडतो की काय अशी भीती वाटत होती. पण दोन दिवसांनी आरव शुद्धीवर आला आणि आमच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. आता आमच्या हयातीत पतवन्डाचे तोंड पहावे ही आमची इच्छा मात्र लवकरात लवकर पूर्ण करा हीच अपेक्षा! “
आपल्या करीअरमध्ये आरव आणि आराध्या दोघेही पार बुडून गेले होते. त्यामुळे बाकी कोणत्याही गोष्टींना वेळ देणे त्यांना परवडणारे नव्हते. मूल होऊ देणे हा तर त्यांच्या कार्यालयीन उद्दिष्टांमध्ये खूप मोठा अडथळा ठरणार होता. त्यामुळे ही गोष्ट ते मुद्दाम टाळत होते. 
आजी मात्र तिच्या याच इच्छेची त्यांना सातत्याने आठवण करून देत होती.

वाढत्या वयोमानानुसार आजी आता थकत चालली होती. त्यामुळे ती आता अधिकच घाई करू लागली. शेवटी नाइलाजाने दोघांनी तिच्या इच्छेचा मान राखण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू केले.
तारुण्याच्या या बहरात दोघांचा ऑफिसच्या कामाचा उत्साह अगदी पराकोटीला पोहोचला होता. 
सकाळी लवकर बाहेर पडणे, रात्री उशीरा घरी येणे, प्रवासाची दगदग, वेळी-अवेळी जेवण घेणे, फास्ट-फूडवर पोट भरणे, अपुरी विश्रांती – यातून स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला त्यांना सवडच मिळेना. 
अशा परिस्थितीत कितीही प्रयत्न केले तरी आजीची इच्छा पूर्ण होण्याची काही चिन्हे दिसेनात. 
दुसरीकडे आजीचा हेका मात्र कायम चालूच होता. 

मग त्यांनी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्याप्रमाणे उपाययोजना चालू केली. परंतु त्यातूनही काही यश मिळेना. म्हणून या विषयातले तद्न्य डॉ. जोशी यांच्याकडे ते गेले. 
त्यांनी दोघांच्या सखोल तपासण्या केल्या. त्यांचा दिनक्रम विचारला. त्यांचा कौटुंबिक इतिहास जाणून घेतला आणि त्यावर आधारित काही औषधोपचार सुरु केला आणि दोन महिन्याने पुन्हा यायला सांगितले. 
दोन महिने उलटले. मात्र त्यातूनही काही साध्य होत नाही हे बघून डॉ. जोशी म्हणाले, “आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही एक मूल दत्तक का घेत नाही?” 

हा प्रस्ताव आला याचा अर्थ बाकी सर्व वैयक्तिक मार्ग संपले हे त्या दोघांनी त्याक्षणी ताडले. 
“आजीच्या पुराणमतवादी विचारांना हे अजिबात पटणार नाही. तेव्हां, अन्य काही उपाय असेल तर सांगा”, आरव म्हणाला. 
थोडा वेळ विचार करून डॉ. जोशी म्हणाले, “तुम्हाला आता स्पष्टच सांगतो. आजकालच्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून असेल किंवा अन्य काही कारणाने असेल, पण हल्ली बऱ्याच जोडप्यांमध्ये जननक्षमता नष्ट होत चाललेली दिसून येते. ही संयुक्त प्रक्रिया असल्यामुळे यात कुणाही एका जोडीदाराला दोषी धरता येत नाही. पण त्यामुळे पारंपारिक पद्धतीच्या उपाययोजनांचा हल्ली उपयोग होईनासा झाला आहे. 

या विषयातले एक तद्न्य डॉ. भारद्वाज माझ्या ओळखीचे आहेत. त्यांनी याबाबत बरेच संशोधन केले आहे. योगायोगाने उद्याच त्यांचे एका संशोधन प्रबंधाबद्दलचे भाषण आम्हा डॉक्टर सहकाऱ्यांसाठी आयोजित केलेले आहे. तुमची इच्छा असेल तर या कार्यक्रमात तुमच्या उपस्थितीसाठी मी खास परवानगी घेऊन ठेवीन.” 
“आम्ही अवश्य येऊ, डॉक्टर”, आरव आणि आराध्या एकमुखाने म्हणाले.
दुसऱ्या दिवशी दोघेही अगदी उत्सुकतेने कार्यक्रमाला हजर झाले. 
औपचारिकता आणि प्रास्ताविक झाल्यानंतर डॉ. भारद्वाजांनी प्रत्यक्ष विषयालाच हात घातला.

“आजकाल मानव जातीत वंशशास्त्राच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागल्या आहेत. मग इतर सजीवांमध्ये- प्राणी आणि वनस्पतींमध्ये- अशा प्रकारच्या समस्या उद्भवत नाहीत का? आणि उद्भवल्या तर ते त्यावर कशी मात करतात? यावर शास्त्रज्ञांनी जे थोडेफार संशोधन केले आहे त्याचा मानवासाठी काही उपयोग करून घेता येणे शक्य आहे का? या प्रश्नांची चर्चा जरा विचार करायला लावणारी आहे. 
इंग्लंडमधल्या एक्झेटर विद्यापीठात केलेल्या एका संशोधनानुसार, “विदूषक मासा (क्लाऊन फिश)” या प्रजातीमध्ये एक विशिष्ट प्रकारची क्षमता असते. यात मादी जर मरण पावली तर नर मासा आपले लिंग बदलू शकतो आणि मादीप्रमाणे अंडी घालू शकतो. म्हणजे एकच मासा, नर आणि मादी या दोन्ही लिंगांचे काम करून नवीन पिढीची उत्पत्ती करू शकतो. 

माशामध्ये अशा प्रकारची क्षमता निर्माण करणारे जे विशिष्ट संप्रेरक (हॉर्मोन) आहे, ते हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी वापरून, तिथून काढून मानवाच्या शरीरात स्थापित केले तर मानवातही अशा प्रकारची क्षमता निर्माण होऊ शकेल का, आणि मग आवश्यकतेनुसार किंवा क्षमतेनुसार पती किंवा पत्नी यापैकी कुणीतरी एकचजण नवीन पिढीच्या निर्मितीची जबाबदारी पेलू शकेल का याबाबत सप्रयोग संशोधन केले तर ते नक्कीच उपयुक्त ठरू शकेल. 
हे झाले प्राणी-सृष्टीतले उदाहरण. आता आपण वनस्पती सृष्टीकडे वळू. संशोधकांना उत्तर ऑस्ट्रेलियाच्या मैदानी प्रदेशात काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आढळून आल्या आहेत. या काटेरी झुडपाला जांभळ्या रंगाची फुले येतात. परंतु संशोधकांना प्रत्येकवेळी या फुलांचे लिंग बदलत असल्याचे आढळून आले आहे. 

सोलानम प्लास्टीसेक्सुम नावाच्या या वनस्पतीच्या एकाच फुलात कधी पुंकेसर असतात तर त्याच फुलात कधी स्त्रीकेसर असतात. म्हणजे हे फूल लिंगबदल करते. मग तात्पुरते लिंगबदल करण्याची ही क्षमता मानवात संक्रमित करून त्या जोडप्याची जननक्षमता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेता येऊ शकेल का? याबाबतचे संशोधन नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.
“आता अशा प्रकारचे संशोधन करण्यात काही अडचणी आहेत, त्या आपण समजून घेऊ. यापुढील संशोधन हे सप्रयोग केले पाहिजे. त्यात काही धोकेही आहेत. मग आपल्यावर संशोधन करून घ्यायला कोणता मानव पुढे यायला तयार आहे? 

यातील दुसरी अडचण अशी आहे की, या प्रयोगांमधून मानव आणि प्राणी किंवा मानव आणि वनस्पती यांचे संकर जन्मास घालण्याचा प्रस्ताव आहे. बऱ्याच शास्त्रज्ञांनी याला विरोध केला आहे. त्यांच्या मते यातून अर्धा-प्राणी आणि अर्धा-मानव असा जीव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि असे झाले तर त्यातून अनेक नवीन समस्या उद्भवतील. त्यामुळे सध्या तरी जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये असे संकर निर्माण करण्यावर बंदी आहे. 
तरीसुद्धा काही संशोधकांना यात यश मिळण्याची खूप शक्यता वाटते आणि ते आपले प्रयोग करायला जोमाने पुढे सरसावले आहेत. हे जाणून, जपान सरकारने असे प्रयोग करायला नुकतीच मंजुरी दिली आहे. 

त्यामुळे असे प्रयोग करायचे असतील तर ते जपानमध्येच करावे लागतील. आणि त्यासाठी, आपल्यावर असे प्रयोग करून घ्यायला तयार असणाऱ्या व्यक्तीची काही दिवस जपानमध्ये वास्तव्य करण्याचीही तयारी असली पाहिजे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन यात रस असणाऱ्या डॉक्टरांनी अधिक माहितीसाठी मला भेटावे. धन्यवाद.”
त्यानंतर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात कुणीतरी शंका व्यक्त केली, “समजा वैद्यकीय दृष्ट्या हे सर्व यशस्वी झाले, तरी या अशा लिंगबदलाला नैतिकतेतून विरोध होणार नाही का? हे प्रत्यक्षात आले तर स्त्री आणि पुरुष यांच्या स्वतंत्र अस्तित्वाला काही अर्थच राहणार नाही. त्यांना एकमेकांची ‘गरज’च वाटणार नाही. स्वैराचार माजेल. विवाहसंस्था आणि पर्यायाने कुटुंब व्यवस्थाच धोक्यात येईल. समाज याला कितपत मान्यता देईल?” 

डॉ. भारद्वाजांकडे उत्तर तयारच होते, “आणि जे खरोखरच अडचणीत आहेत त्यांचा विचार कुणी करायचा? आपण व्यक्त केलेले सर्व धोके टाळण्यासाठी कायद्याने काही बंधने घालता येतील. पण म्हणून वैद्यकीय प्रगती करायचीच नाही आणि आपण पुढे जायचेच नाही असे तर नाही होऊ शकत. 
नुकतीच एक बातमी तुम्हीही वाचली असेल! ललित साळवे नावाचा एक पुरुष महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत होता. तो जरी पुरुष असला तरी त्याच्या शारीरिक अवयवांमध्ये बऱ्याच स्त्रीत्वाच्या रचना होत्या. त्या हळूहळू वाढतच गेल्या आणि मग त्याला, आपण ‘स्त्री’च आहोत असे वाटू लागले. शेवटी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याला पूर्ण ‘स्त्री’त्व बहाल करण्यात आले. 

अशाच प्रकारच्या लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करून २०२२ सालात नंदुरबार जिल्ह्यातील विजय वसावे ची विजया वसावे तर नांदेडच्या भरत जेठवाणी ची डॉ. सान्वी जेठवाणी झाली. याउलट, दिल्लीच्या नायला पाशा या मुलीचे २०११ साली लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करून आर्यन पाशा या मुलात रुपांतर करण्यात आले. 
दिल्ली येथील आल्मेक हॉस्पिटल मधील डॉ. नरेंद्र कौशिक हे तर लिंग परिवर्तन तज्ञच आहेत. खरे तर संपूर्ण मानवजातीतच अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया अत्यंत दुर्मिळ आहेत. पण असे असले तरी ही काही पहिलीच लिंगपरिवर्तन बाब आहे असे मात्र नाही हं ! प्राचीन भारतीय संस्कृति ही विज्ञान क्षेत्रात खूप प्रगत होती. याबाबतचे अनेक दाखले देता येतील. 

त्यापैकीच ‘श्रीमद्भागवता’च्या नवम स्कंदात सांगितलेली ही एक कथा:--‘ब्रह्मदेवाने पहिल्या मनुला राजा बनविले. मनू आणि त्याची पत्नी श्रद्धा यांना अपत्य हवे असते. त्यासाठी ते यज्ञ करतात. परंतु यज्ञात दोघांच्याही कामना वेगवेगळ्या असतात. मनूला मुलगा हवा असतो आणि श्रद्धेला मुलगी हवी असते. त्यामुळे यज्ञात एक समस्या उभी रहाते. यज्ञ म्हणजे फक्त अग्नीत हवन करणे नाही. यज्ञ ही एक मानसिक प्रक्रिया आहे. कोणती भावना ठेऊन यज्ञ करतो ते महत्वाचे आहे. यज्ञ झाल्यावर श्रद्धेला मुलगी झाली. तिचे नाव इला ठेवले. श्रद्धेची भावना मनूच्या भावनेपेक्षा प्रभावी होती म्हणून मुलगी झाली. परंतु त्यामुळे मनू क्रोधित झाला. त्याने ब्राह्मणांना याबाबत विचारले. ब्राह्मण म्हणाले, ‘ठीक आहे, सर्व व्यवस्थित होईल.’ 

मग वसिष्ठ ऋषींनी कन्येचे लिंग बदलून तिला पुरुष बनविले. इलेचे नाव सुद्युम्न झाले. परंतु त्यामुळे मनू आणि श्रद्धा यांच्यात भांडण झाले. म्हणून, सुद्युम्न एक महिना पुरुष राहील आणि एक महिना स्त्री राहील असे वसिष्ठांनी केले. स्त्री-रुपात असताना तिचा बुधाबरोबर विवाह झाला आणि त्यापासून पुत्रप्राप्तीही झाली. तसेच पुरुष-रुपात असताना स्वत:मधील स्त्रीपासून सुद्धा पुत्रप्राप्ती झाली. म्हणजेच सुद्युम्नातील पुरुष-रुपात आणि स्त्री-रुपात पूर्णत्व होते.- - —‘ तर अशी ही कथा! आता, ‘या वैद्यकीय व्यासपीठावर ही भाकडकथा किंवा छद्मवैज्ञानिक कथा कशाला सांगताय’ अशी टीका होणे स्वाभाविक आहे. 

परंतु इथे हे नमूद करणे आवश्यक आहे की, अनेक शास्त्रीय शोध हे विज्ञानकथांमधील कल्पनांमधून लागले गेले आहेत, असा आजवरचा इतिहास सांगतो. 
तेव्हां, या कथेतून प्रेरणा घेऊन, आजच्या काळाला सुसंगत असे नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? भारतीय संस्कृतीतील संकल्पना सिद्ध करून दाखविण्याची संधी अनायासे चालून आलेली आहे, तिचा उपयोग करून घ्यायलाच पाहिजे. तेव्हां, एकदाच कायमचे लिंगबदल, किंवा आवश्यकतेनुसार बदलते लिंगपरिवर्तन, अशा दोन्ही बाबतीत ऐतिहासिक दाखले आहेत. 

शिवाय, या कथा इथेच थांबलेल्या आहेत. अनावश्यक कारणासाठी उगाचच त्यांची पुनरावृत्ती करण्याचा इतर कुणी फारसा अट्टाहास केलेला नाही. तेव्हां, केवळ सार्वजनिक दुष्परिणामांचा बाऊ करीत न बसता, योग्य संयम पाळून, पुढे चालत राहिले तरच जीवन प्रवाही राहू शकेल असे मला वाटते.”
या नवीन प्रस्तावावर विचार करण्यातच आरव आणि आराध्यानी ती रात्र घालवली. 

“मुख्य म्हणजे आजीला हे असले प्रयोग मान्य होतील का?” आरवने नकारात्मक सूर लावला. “तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं अगदी नैसर्गिकरीत्या व्हायला पाहिजे. ती नेहमी सांगते की माझ्या जन्माच्या वेळी डॉक्टरानी आईला सिझेरियन करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आजीने त्याला ठाम विरोध केला. तिचं म्हणणं, जरा धीर धरा, सबुरीनं घ्या; निसर्गाच्या कलाने घेतले तर सगळं सुरळीतच होते. आणि खरंच तसे झाले. त्यामुळे अशा कृत्रिम प्रयोगांना आजीचा होकार मिळणे अजिबात शक्य नाही.” 

थोडा विचार करून आराध्या म्हणाली, “आजीला यातलं काहीही कळू न देण्याची खबरदारी आपण घेतली तर? यातून सर्वांचंच हित साधणार आहे.” 
 “अगं पण इतके दिवस जपानमध्ये रहाण्यासाठी सुटी कशी मिळेल?” आरवचा प्रश्न. 
परत थोडा वेळ विचार करून आराध्या म्हणाली, “आपण असं करूयात का? टोकियो विद्यापीठाची एमबीए करूयात. इथल्या नोकरीतून स्टडी लीव्ह घेऊन जपानला जायचे, कोर्सही पूर्ण करायचा आणि त्याचवेळी प्रयोगही करून घ्यायचे. म्हणजे आजीलाही काही समजणार नाही.” 
आरवला ही कल्पना एकदम आवडली. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच आरवने डॉ. जोशींना फोन लावला, “आम्ही दोघेही प्रयोग करून घ्यायला तयार आहोत. डॉ. भारद्वाजना आमची नावे कळवा.”
प्रयोगाबाबत आजीला काहीही कळणार नाही याची काळजी घेत, ठरल्याप्रमाणे दोघेही जपानला रवाना झाले.
दीड वर्षानंतर परत येताना मात्र दोनाचे तीन झाले होते. 
घरी पोहोचताच आजीने उंबरठ्यावरच तिघांना रीतीप्रमाणे ओवाळले. 

मग आराध्याच्या हातातलं बाळ कौतुकाने जवळ घेत म्हणाली, “माझा हट्ट पुरवलास खरा, पण लबाडा, त्यासाठी आई-बाबांना जपानमध्ये बोलावलस होय!” आणि बाळाला लगेच आराध्याकडे परत देऊन आजी आपल्या कामाला लागली. 
बाळाला बघून आजीला इतका आनंद होईल की ती बाळाला सोडणारच नाही असे आरवला वाटले होते. पण आजीचे आताचे वागणे त्याला जरा विचित्रच वाटले. 

खरोखर आजीच्या मनासारखे झाले आहे की नाही? 
बाळाबद्दल काहीही न बोलता आजीने आपल्याला घरकामात गुंतवून घेतले. 
ते बघून आरव म्हणाला, “अगं आजी, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरानी बाळाची चांगली काळजी घेतली. पण तू असतीस तर त्याला खूप माया मिळाली असती, खूप लाड केले असतेस.” 

आजीने नुसता हुंकार दिला. 
पण तिचा असा अलिप्तपणा सहन न होऊन आरवने विचारले, “पण आजी, पतवंडाचे तोंड बघून तू खरंच खुश आहेस ना आता?” 
त्यावर आजी म्हणाली, “हो रे बाळा, मी खुश आहेच. पण एक गोष्ट मनात सलत रहातेच. सगळ्या गोष्टी सहजपणे घडत गेल्या तर त्याचे खूप कौतुक वाटते. ओढूनताणून काही घडवून आणणे म्हणजे देवाच्या आणि निसर्गाच्या कामात ढवळाढवळ करणेच की ! मग तिथे ममता सुद्धा कृत्रीमच येणार ना ! माया सुद्धा उसनीच आणावी लागणार ना?” - - - आणि सगळ्या घरात एक भयाण शांतता पसरली.
समाप्त
©® दिलीप अपशंकर.

सदर कथा लेखक दिलीप अपशंकर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखकाची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने