हृदयपरिवर्तन

©® मोनाली हर्षे.

अक्षय इंडस्ट्रीजची टोलेजंग 21 मजली इमारत दिमाखात उभी होती. 
टॉप फ्लोअरवर आपल्या प्रशस्त ऑफिसमध्ये इझी चेअरवर मालक अक्षय मेहरा तणावात बसला होता .

आजचे शंभर कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी कोण अधिकारी एकावरच्या किती पूज्यांना वश होतो हे त्याने आधीच माहीत करून ठेवले होते. 
कसेही करून हे कॉन्ट्रॅक्ट तोच मिळवणार होता. 

या धंद्यातल्या रेस मधला अक्षय हा डर्बी जिंकणारा घोडा होता.

मागच्या वर्षी ती शंकरनच्या' स्टेप अहेड 'ग्रुपने थोडक्या करता बाजी मारली होती. अव्वल नंबर निसटल्यामुळे 'बिझनेसमन ऑफ द इयर' सुद्धा हुकले. हे सर्व यावर्षी मिळवायचेच होते. 

अडचणीत भर म्हणून दहिसरच्या मोक्याच्या जागेच्या हस्तांतरणात अडथळे येत चालले होते. नवीन युनिटच्या उभारणीला उगीचच विलंब होत चालला होता.
हाताच्या चारी बोटांवर अक्षयने निरनिराळ्या संकटनाशक अंगठ्या सुद्धा चढवून घेतल्या होत्या. तरीही मनाची तगमग कमी झाली नव्हती. 

त्याची ऑडी तयार आहे कळल्यावर युनिफॉर्म मधल्या लिफ्टमननं त्याला खाली आणून सोडलं. पोर्चमध्ये गाडी जवळ युनियन लीडर यादव त्याच्यासाठीच ताटकळत होता.

" हे बघ यादव,व्हाल्व लिक मुळे विष गळतीने जे दोन कामगार अत्यवस्थ आहेत त्यांचं कायद्यान जे होतं ते मी देईन. त्या ऊपर काही मागू नकोस. जास्त माणुसकी, दया वगैरे बोललास तर त्यांच्या हलगर्जीपणामुळेच व्हाॅल्व तुटला असं मला सिद्ध करायला सोपं आहे." 

नाईलाज झालेला यादव खाली मान घालून चालता झाला .

तणावपूर्ण दिवसाची नोंद अक्षयने घेतली नसली तरी आजची ब्लड प्रेशर ची गोळी चुकलेल्या त्याच्या हृदयाने आत मध्ये घेतली होती. 

आलिशान 'यशपूर्ती' बंगल्याकडे गुर्मीत आपल्या यशाचं प्रतीक म्हणून पहात अक्षय घरात शिरला. 
ना बागेतल्या गुलाबांनी, ना समोर आलेल्या बायको व आईमुळे त्याला आनंद वाटला.
मुलगी ओवी ची प्रेमळ चिव चिव ही त्याने काना आड केली. 

त्याचं बिजनेस माइंड कधीच 100 कोटींचं गणित सोडवण्यात व्यग्र झालं होतं. 
त्याच्यामते गावंढळ असलेली पण खरी कामसू ,सोशिक दिशा-त्याची पत्नी त्याच्या आई-वडिलांची, नातेवाईकांची लाडकी होती.

पार्टी वुमन नसली तरी सरळ साधी प्रेमळ होती बिचारी.

तिच्याकडे खाण्याची ऑर्डर देऊन अक्षय विचार करीत सिगरेटी फुंकायला मोकळा झाल. जोडीला दोन पेगही पोटात गेले. 
हृदयाने आता संपाची तयारी सुरू केली होती हा संप पैशांच्या वाटाघाटींना बधणारा नसणार होता. 

अक्षय मेहरा पासून 700 किलोमीटर अंतरावर गोड गळ्याची 24 वर्षांची मालविका यमन गात होती. तिच्या गाण्यात तिने तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिले होते. 
त्याने संधिकालात शांत ,भक्तीपूर्ण वातावरण निर्माण केले होते .

मालविकाच्या गोड स्वरांत शंभर,सव्वाशे श्रोतावर्ग सुरांत चिंब न्हाऊन निघत होता .
तिच्या जवळची ओळखीची म्हटली तरी शंभर माणसं आज गाण्यांनी तृप्त झाली होती. 

चोविशीतली मालविका रसिक कलाकार तर होतीच .शिवाय तिला समाजसेवेचीही विशेष आवड होती .अगदी लहान वयातच मालविकाला विरळाच दिसणारे समाजभान होते. 

देवदयेने जे आपल्याला मिळाले ,ते वंचितांना वाटून त्यांच्या आयुष्यात थोडा आनंदाचा मोगरा फुलवावा असे तिचे सुंदर विचार होते .

गाण्याचे कार्यक्रम करून ती तिथे जमवलेले पैसे "कौमुदी"बालकाश्रमाला देत असे. 
या सहृदय ताईमुळे त्या लहानग्यांच्या आयुष्यात आनंदाचे चांदणे फुलत असे .दिवाळीला गोडधोड जेवण, रंगीत दिवे, नवे कपडे अशी हौस मौज करता येई. 

नशिबाने प्रतारणा केलेले ते अश्राप बाल जीव चातकासारखी मालविकाची वाट पाहत. ती सुद्धा वेळात वेळ काढून त्यांच्याशी खेळायला जात असे. मुलात मूल होऊन राहत असे.

इकडे रात्री अकरा वाजता यमदेवाच्या स्क्रीनवर अक्षय मेहराचं नाव झळकलं .

त्याला मॅसिव हार्ट अटॅक आला .धावपळ करीत दिशाने वेळेवर त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

तातडीची शस्त्रक्रिया करूनही अतिदक्षता विभागात ठेवलेला अक्षय म्हणावा तसा प्रतिसाद देत नव्हता .
त्याचं 45 वर्ष अतिरिक्त पळालेलं,तणाव झेलून थकलेलं हृदय फक्त सात ते दहा टक्केच काम करीत होतं. व्हेंटिलेटरवर दहा दिवस प्रतीक्षेत संपले. 

डॉक्टरांनी हार्ट-ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला .
पैसा पोत्यांनी असला तरी हृदय हे एकमेवच मॅच होणारंच लागतं. 

खरं तर डॉक्टर नॉर्मन शमवेंनी लोकप्रिय केलेलं 'हृदय प्रत्यारोपण' हे फार अवघड गोष्ट आहे .
एक तृतीयांश रुग्ण दात्याच्या हृदयाचा शरीराकडून अस्विकार केला गेल्याने दगावतात. 
मुळात सर्व गुणसूत्र जुळणारा दाता मिळणे सहा महिने ते वर्षभर लांबू शकते .

पण अक्षयच्या बाबतीत तो कॅटेगिरी स्टेट्स एक मध्ये म्हणजे, कृत्रिम श्वसन प्रणालीवर असून महिन्याहून जास्त जगण्याची शक्यता नसल्याने व केवळ नशिबानेच योग्य दाता मिळाल्याने प्रथम प्राधान्य प्राप्त कर्ता झाला. 

गोवा-मुंबई हायवे वर झालेल्या भीषण अपघातात अवयवदान नोंद केलेली एक तरुणी ब्रेन डेड झाली. 
ग्रीन कॉरिडाॅर ने तिचे हृदय अक्षय पर्यंत पोहोचले. 

तब्बल महिनाभराने अक्षयने कृत्रिम मशीन शिवाय स्वतःचा श्वास घेतला. समोर दिशाकडे बघून त्याचे डोळे भरून आले. 

अक्षय इंडस्ट्रीजची घरगुती ,बिन पगारी नोकरच असल्यासारखी वागवलेली दिशा ते अश्रू बघून भांबावून गेली. अक्षयने तिचे दोन्ही हात हातात घेतले ,"दिशा तू नसतीस तर माझं काय झालं असतं?" 

दिशाला कळेना अक्षयचे हृदय परिवर्तन सुखकारक असले तरी कायमचे आहे की हा हॉस्पिटलचा प्रभाव आहे?आजपर्यंत चिमुकल्या ओवीने वडिलांना फक्त घरी येणारा व जाणारा एक माणूस म्हणूनच पाहिले होते. 

त्याने कधीच तिच्या भाव विश्वाचा घटक होण्याचा प्रयत्नही केला नव्हता. त्याचा तिचा संबंध फक्त गुणसूत्र देण्यापुरता होता जणू! 

पण आता मात्र अचानकच तो दिशाला म्हणू लागला "मला ओवीला पहावे वाटते, तिचे लाड करावे वाटतात. डॉक्टरांची परवानगी मिळेल तेव्हा तिला भेटायला आण." 

जवळपास सहा टक्के हृदयप्राप्तकर्ते रूग्ण दात्याचे भावनिक गुण घेऊ शकतात. इथेही देवदयेने मालविकाचे दयार्द्र हृदय अक्षयला बदलू पहात होते. 
भौतिकवादी माणूस भावनिक होऊ लागला होता. 

बऱ्या झालेल्या अक्षयचे वागणे सर्वांनाच अचंभित करणारे होते .
पण अक्षयच्या आत संवेदनशील, प्रेमळ मालविकाचं हृदय मात्र प्रत्येक ठोक्यासरशी मेघमल्हार गात होतं!
समाप्त
©® मोनाली हर्षे

सदर कथा लेखिका मोनाली हर्षे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने