मजहब

©® सौ. अमृता देशपांडे.
'मधुरा, मधुरा... कशी आहेस? काय गं सासरी गेलीस आणि तिकडचीच झालीस! आता आईबाबांनी तर तुझं नावंच टाकलं म्हणा... पण माझ्याशी तर फोनवर बोलूच शकतेस नं?' मधुराची मोठी बहिण श्रावणी.
आज अचानक बाजारात भेट झाली दोघी बहिणींची.

'मी बरी आहे ताई, मलाही तुझी खूप आठवण येते. तू कशी आहेस? तुला खरंच माझी आठवण येते? मग फोन का नाही केलास इतके दिवस? माझा नम्बर अजुन बदललेला नाही...' मधुरा

'पण बाकी सगळंच बदललंस नं? धर्म, नाव, कपडे...' बोलता बोलता श्रावणी अडखळली. 

कुठे आपली जिन्स टॉप घालणारी, केस मोकळे सोडणारी हसरी, बिंधास्त मधुरा आणि कुठे ही पायाचे नखही दिसणार नाही असा काळाजर्द बुरखा पांघरलेली, डोक्यावर हिजाब बांधलेली आताची 'आयेशा'...

'बटाट्याच्या काच-या केल्या कि तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही...' तिच्या हातातील काळ्या पिशवीतील लिबलिबीत पदार्थाकडे तुच्छतेने बघत श्रावणी म्हणाली. 
मधुराला ते लक्षात आल्याशिवाय राहिले नाही.

'जाऊ दे ना ताई, तुझंही लग्न झालं ते तरी तू कुठे कळवलंस मला? जिजाजी कसे आहेत? काय करतात? घरी कोण-कोण असतं तुझ्या?' मधुरा विषय बदलत बोलली.

'तू मला सांगितलंस अमनबरोबर पळून जाणारेस ते? बरं जाऊदे! तुझ्या पळून जाण्यामुळे सुरवातीला माझ्या लग्नात खूप अडचणी आल्यात. लोक आईबाबांना काय-काय बोलायचे माहितीये?’ श्रावणी मधुराकडे रोखून बघत बोलली.

'आता सावरलेत ना ते...' मधुरा तिचं वाक्य तोडत म्हणाली.

 'सावरलेत? मधुरा बाबांना दोन हार्ट अटॅक येऊन गेलेत. एकदा तू पळून गेलीस त्या धक्क्यानी,आणि एकदा माझं लग्न तुझ्या पळून गेल्यामुळे मोडलं म्हणून!'

‘……..’

‘असो! राघव धर्माधिकारी, माझे मिस्टर, इंजिनियर आहेत, सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट हेड आहेत. सासरे रिझर्व बॅंकेतून रिटायर्ड झालेत. सासूबाई शिक्षिका होत्या, त्यापण रिटायर्ड आहेत. मला अगदी मुलीसारखं वागवतात. मी त्याना सासू सासरे नाहीतर दुसरे आईबाबाच म्हणते... आई तर मला बुटिकमध्ये मदतसुद्धा करतात.' श्रावणी समाधानाने म्हणाली.

'अमन कसा आहे? गॅरेज कसे सुरु आहे त्याचे? अमनचे अम्मी-अब्बू काय म्हणतात? तुझ्याशी चांगले तर वागतात नं?' श्रावणीने विचारले.

'माझ्याबद्दल एवढंच सांगते ताई, मी आता अमनची बायको नाही, सावत्र आई आहे...' एवढे बोलून मधुरा श्रावणीच्या नजरेला नजर न देता निघून गेली. 
श्रावणी तिच्या पाठमो-या आकृतीकडे सुन्न होऊन बघत राहिली.
******
मधुरा घरी आली आणि बेडरूममध्ये तिने स्वत:ला बंद करून घेतले. अन् आपल्या अश्रूंना तिने वाट मोकळी करून दिली. तिच्याही नकळतपणे ती तिच्या भूतकाळात जाऊन पोहोचली.

तिचे शालेय शिक्षण मुलींच्या कॉलेजमध्ये झाले, त्यामुळे मुलांशी कधी जास्त संबंध नाही आला. दहावीला उत्तम टक्केवारी मिळवून तिने शहरातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिथेच पहिल्यांदा मुलांशी मैत्री झाली. अल्लड वय, मोकळं वातावरण, सारं कसं हवंहवंसं वाटणारं... तिथेच तिची अमनशी ओळख झाली. 

उंचपुरा, गोरापान, कुरळे केस असलेला, काजळ लावणारा मोठ्या-मोठ्या डोळ्यांचा अमन होताच बघताक्षणीच कोणत्याही मुलीला भुरळ पाडणारा! शॉर्ट कुर्ता आणि जीन्स घालून बाईकवरून जेव्हा तो कॉलेजमध्ये यायचा तेव्हा मुलींच्या काळजाचा ठोका चुकायचा. मधुरालाही तो खूप आवडायचा. 
त्याचं मुलींशी आदबीने बोलणं, नमाजची वेळ झाल्यावर जिथे असेल तिथे नमाज अदा करणं, इतर धर्मांविषयी आदराने बोलणं, तिला भावलं. ती त्याच्याकडे कधी आकर्षित झाली तिचं तिलाच कळलं नाही. 

तिने हळूहळू त्याच्याशी मैत्री वाढवली. त्याच्यासोबत वेळ घालवणं तिला आवडू लागलं. आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहणारी मधुरा आता दिवसरात्र अमनचं स्वप्न बघू लागली. 
अभ्यासातून तिचं लक्ष केव्हाच उडालं होतं. अमनलाही गोरीपान, नकट्या नाकाची पण बाहुलीसारखी सुंदर मधुरा आवडलीच. दोघेही आता दिवसभर एकत्रच हिंडू-फिरू लागले. 

तिच्या बालमैत्रिणीनी,सायलीनी तिला सावध करायचा खूप प्रयत्न केला, पण अमनच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या मधुराने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. नाईलाजाने सायलीला ही गोष्ट श्रावणीताईच्या कानावर घालावी लागली.
श्रावणीनेही तिच्या परीने मधुराला खूप समजवायचे प्रयत्न केले. 

सध्या तिने हे सगळं सोडून अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं,आधी आपलं स्वप्नं पूर्ण करायला हवं हे सगळं सगळं समजावून झालं, पण मधुरा काही ऐकत नव्हती. आणि एकदिवस श्रावणीला ज्याची भीती होती तेच झालं. 
तिच्या वडीलांनी मधुराला अमनसोबत बाईकवर खेटून बसून जाताना पाहिलं, आणि घरात भुकंपच झाला. 

"माझा जोडीदार मी ठरवलाय, लग्न करेन तर अमनशीच'!' असे मधुराने ठणकावून सांगितले. 
आपली मुलगी खूप शिकेल, आपल्या पायावर उभी राहिल, मग आपण तिच्यासाठी सुयोग्य जोडीदार बघू अशी स्वप्नं पाहणा-या मायबापांसाठी हा खूप मोठा धक्का होता. 

तरीदेखील तिच्या वडीलांनी अमनची, त्याच्या घरच्यांची माहिती काढली. 
अमनचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही, घरातील कोणालाच शिक्षणाचे महत्व नाही, अमनच्या दोन्ही भावांची दोन-दोन लग्न झाली आहेत, एवढी सगळी महिती त्यांनी काढली. 

शिवाय त्यांच्या आणि आपल्या राहणीमानातील, खानपानातील फरक त्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी अमनच्या घरी जाऊन अमनच्या आईवडिलांना भेटले. 

अमनला समजावण्यासाठी त्यांच्या हातापाया पडले. एक बाप आपल्या मुलीसाठी जे काही करू शकतो, ते सर्व त्यांनी केले. तिच्या आईनेही तिला त्या लोकांमध्ये स्त्रियांकरता असलेले कडक कायदे, निर्बंध, स्त्रियांचे असलेले दुय्यम स्थान सगळे समजावले. पण सगळे व्यर्थ! 

'अमन खूप चांगला आहे, आधुनिक विचारांचा आहे. तो मला खूप शिकवेल, चांगला वागवेल' यावर मधुरा ठाम होती.
'अमन, माझे आईवडील नाही ऐकणार रे...' मधुरा एका संध्याकाळी अमनला म्हणाली.
'आता मला एकच पर्याय दिसतोय मधू...'
'कोणता?'
'लग्न! आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं...'
'काय? पण इतक्या लवकर? मला फार भीती वाटतेय रे...' त्याच्या डोळ्यांत बघत मधुरा म्हणाली.
'त्यात काय घाबरायचं? आज ना उद्या आपल्याला लग्न करायचंच आहे ना? आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुला राणीसारखी ठेवेन... '

'अरे पण, अजून आपले शिक्षण पूर्ण झालेले नाही, शिवाय आपण आपल्या पायावर उभेदेखील नाही...'
'बस काय! माझ्या अब्बूंचा मोठ्ठा बिझनेस आहे, आणि आपण आपले शिक्षण सुरुच ठेवूया ना...’ मधुराचे वाक्य मध्येच तोडत अमन बोलू लागला.
'पण अमन, मला तुझ्या धर्माविषयी काहीच कल्पना नाही. तुमच्या इथल्या पद्धती, चालीरिती...'
‘आता आपल्या प्रेमात धर्म आडवा येणार का? अगं आमच्याकडे सगळे खुल्या-आधुनिक विचारांचे आहेत. आणि आमच्याकडे स्त्रियांच्या मताचा खूप आदर केला जातो. मी तुला वचन देतो, तुला माझा धर्म किंवा चालीरिती काहीही पाळण्याचे बंधन किंवा जबरदस्ती कोणीही करणार नाही. माझे अम्मी-अब्बू तुला मुलीसारखं प्रेम देतील…'

'खरंच?'
'माझ्यावर विश्वास आहे ना तुझा?'
'स्वत: पेक्षा जास्ती' त्याच्या छातीवर डोकं टेकत मधुरा म्हणाली.
*****
'आयेशा, ओ महारानी... कबसे कमरे मे दरवाजा बंद करके बैठी है? आज खाना बनाना है के नही?' दारावर जोरजोरात पडणा-या थापेने मधुरा भानावर आली. 
तिने पटकन डोळे पुसून दरवाजा उघडला. दारात अमनची अम्मी होती.

'हाय अल्ला! देखो तो इस महारानी को! यहा हमारे पेटमे भुकके मारे चुहे दौड रहे और ये महारानी आराम कर रही अन्दर...'
'जी मै बस अभी खाना बना देती हु...'
'बडी मेहेरबानी!' तोंड वाकडं करत अमनची अम्मी.

बाजारातुन आणलेल्या कोंबडीची पिसं साफ करताना तिच्या मनात आलं, हे असंच या कोंबडीसारखंच झालंय आपल्या आयुष्यात... आधी अमननं भरपूर लाड करून आपला विश्वास संपादित केला. जेव्हा मी त्याच्या खुराड्यात विसावली, तेव्हा खाटकन माझ्या मानसन्मानाचा खून केला. 

मग या कोंबडीची पिसं जशी छाटावी तशी माझी स्वप्नं छाटलीत, अन मग माझे लचके तोडून मिटक्या मारत खाल्ले त्याने आणि त्याच्या घरच्यांनी... ती विचार करतच होती, तेवढ्यात तिला अमनच्या येण्याची चाहुल लागली. 
अमन आला तोच तणतणत! दारूच्या नशेत धुंद अवस्थेत त्याने आपल्या अब्बूला हाक मारणे चालू केले.

'अरे क्यो चिला रहे हो? अब ये तुम्हारा रोजका नाटक हो गया है, कुछ कामधंदा तो करते नही, सूरज सरपे आया नही तो शराब पिने चले जाते हो, और् नशे मे धुंद होके लडाई करने चले आते हो...' अमनचे अब्बू.

'तो और क्या करू? जिसका बाप बेटे के औरतको उससे छिनकर खुद उसके मजे लूट रहा हो, तो वो बेटा क्या करे?' अमन अडखळत तोल सावरण्याचा प्रयत्न करत बोलत होता.

'अपनी जुबानको लगाम दो! तुम खुद अपनी जुबानसे उसको तलाक दे चुके हो. वो तो तुम्हारे अब्बूने घरकी बात घरमे रहे, इसलिये आयेशासे हलाला कर लिया नही तो कितनी बदनामी होती हमारी समाजमे...' अमनच्या अम्मीने अमनला दटावले.
'हलाला किये एक साल होनेको आया अम्मी! अभी तक आपके शॉहरका मन नही भरा मेरी बेगमसे...' अमन चिडून म्हणाला.

'मुझे कुछभी बोलनेसे पहले आयेशासे पूछो, पूछो उससे के क्या वो चाहती है तुम्हारे पास वापस जाना? उसने खूद मुझसे कहा के वो अब तुम्हारे पास वापस नही जाना चाहती...' अमनचे अब्बू

'क्या? आयेशा...आयेशा... छिनाल कही की! मझाक समझ रखा है क्या सब कुछ?’अमन जोरजोरात ओरडू लागला.

'चिल्लाओ मत अमन! मझाक तर तू बनवलायस रे माझ्या आयुष्याचा, माझ्या प्रेमाचा... आंधळ्यासारखं प्रेम केलं मी तुझ्यावर, आणि तू... काय-काय स्वप्नं दाखवलीस तू मला, मला पुढे शिकू देशील! करीयर करू देशील ! विश्वास ठेवला रे मी तुझ्यावर... . तुझ्यासाठी मी माझं घरदार, मायबाप,बहीण सगळ्यांना सोडून आले. आणि तू काय केलंस? 

मला चार भिंतीत कैद केलंस! तुझ्या घरी आले तेव्हा माहित होतं मला, सोपं नाहीये मला इथे टिकणं! पण तुझ्या प्रेमाखातर मी हिंमत केली. तू म्हणालास तुझ्यावर कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती होणार नाही. प्रेमापेक्षा कुठलाही धर्म मोठा नाही असं मी समजत होते, पण तुझ्याशी लग्न करता यावं म्हणून मला धर्म बदलावा लागला, खरंतर तेव्हाच मला कळायला हवे होते, पण डोळ्यांवर तुझ्या प्रेमाची पट्टी होती ना! 

फक्त अठरा वर्षांची होते रे मी लग्न झालं तेव्हा, थोडे दिवस मला मनाची तयारी करायला वेळ हवाय म्हटलं तर एखाद्या सैतानासारखा धाऊन आलास माझ्यावर... रोज रात्री लचके तोडायचास माझे... तुझ्या अम्मी-अब्बूंची मर्जी राखायची म्हणून हा बुरखा, हिजाब घालायला सुरवात केली मी. 
माझ्या घरी भाजीत कांदा घातला तरी सहन न करणारी मी, तुझ्यासाठी, तुझ्या घरच्यांसाठी चिकन, मटन करायला शिकली. जेवण जायचंच नाही सुरवातीला, मग नाक दाबून खायला शिकले ताटात असेल ते... 

मन मारून जगायला शिकले, स्वत:च जोडून घेतलेले नाते सांभाळत. 
माहेरी जाऊ शकत नव्हती, कारण ते मीच तोडून आली होती. आता कसंही असलं तरी सासरच आपलं जग आहे, अमन आपला नवरा, अमनचे भाऊ आपले भाऊ आणि अमनचे अम्मी-अब्बूच आपले आईवडील असे समजून मी जगायला सुरवात केली होती. 

पाच वेळा नमाज पढायला, सगळे मुस्लिम रीतीरिवाज पाळायला लागले होते. तेव्हा हेच तुझे अब्बू म्हणाले होते, 'अब तुम हमारी बहु नही बेटी हो'! किती निश्चिंत झाले होते मी...
आणि एक दिवस ज्यांना मी माझे मोठे भाऊ मानत होती, त्या तुझ्या भाईजानने माझ्यावर हात टाकला, जबरदस्ती अब्रू लुटली माझी... तुला सांगितल्यावर तू मात्र विश्वास नाही ठेवला माझ्यावर, अन् चिडून तू चक्क तीनवेळा 'तलाक, तलाक, तलाक' म्हणून आपलं नातंच संपवलं. 

इतकं तकलादू असतं कारे हे नातं, की एका शब्दाने ते तुटतं? माझ्यासाठी हाच धक्क्का खूप मोठा होता. त्यातून मी सावरतच होते, की हलालाचा विषय सुरु झाला, तोही तुझ्याच अब्बूंसोबत. 
मला तर तो विचारच सहन होत नव्हता. मी खूप विरोध करायचा प्रयत्न केला. तुम्ही कोणीच माझं ऐकलं नाही. मला वाटलं होतं, अम्मी तरी मला साथ देतील, पण त्याही त्यांच्या शॉहरच्याच बाजूने होत्या… 

पण मग मी मनाला समजावलं, तसंही अमनचे अब्बू तर मला त्यांची मुलगी मानतात. ते मला त्रास देणार नाहीत, माझ्याकडे वाईट नजरेने पाहणार नाहीत. पण माझा हा भ्रम आमच्या निकाहच्या पहिल्या रात्रीच तुटला. त्यांनीही रात्रभर माझे लचकेच तोडले. 

त्यादिवशीच मी मनाने मेले... तेव्हाच मी ठरवलं, तुला आयुष्यभराची अद्दल घडवायची. आयुष्यभर तुझ्या समोर रहायचं, पण तुला तडफडत ठेवायचं...' शून्यात हरवत मधुराने मनातली सगळी गरळ बाहेर ओकली.

'आयेशा, मै तुम्हे छोडुंगा नही, मै तुम्हे मार डालुंगा...' असं म्हणत अमनने तिच्यावर हात उचलला.

'ये गलती कभी मत करना अमन, बहोत गुरूर है ना तुम्हे अपने मजहब पर? अपने मजहबको बढाने के लिएही तुमने मुझे फसाया ना? तो सुनो, सौतेलीही सही पर अब मै तुम्हारी अम्मी हु! और अम्मीपर हात उठानेकी इजाजत कोई भी मजहब नही देता...'
अमनचा हात हवेतच विरला...
समाप्त
©® सौ. अमृता देशपांडे.

सदर कथा लेखिका सौ. अमृता देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने