मनोव्यथा

©® डॉ.मधुलिका महाजन.माझं जन्मस्थान युरोप. माझं युरोप,युरोपातील निर्सगरम्य गाव वडूज. तेथे माझा जन्म झाला. मात्र आज या परक्या भुमीत खितपत पडून माझं दुखर मन आप्तस्वकीय सोडून परक्यांजवळ व्यक्त करतोय्.!
करणार तरी काय?आज माझ म्हणून कुणी उरलेच नाही.आज तुम्ही मला आपल्या हातात अलगद उचलून घेतलं. माझ्या पंखावरून हात फिरवला. सारे युरोपातून आलेले sand पायपर तर माघारी गेलेत.
हा एकटाच मागे कसा उरला म्हणून कंपित स्वरांनी गाईडला विचारणा केली. तुमच्या स्वरातील कंप मला जाणवला म्हणून माझ मन मोकळ करायची हिंमत करतोय् .नाहीतरी हा मनोवेदनांचा बोझा खांद्यांवर घेऊन येणार मरण माझ्या जिवाला शांती देईल असं काही वाटत नाही.

युरोपातील वडूज या गावातील एका सुंदर तळ्याकाठी असलेल्या डेरेदार वृक्षाच्या घरट्यात माझा जन्म झाला. अंगाभोवती असलेलं ते पांढरेशुभ्र कवच फोडून जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा काही दिवस तर ही सुंदर सृष्टी बघू सुध्दा शकलो नव्हतो. आई बाबांच्या आश्वासक पंखाखाली आणि त्यांनी चोचीतून भरवलेल्या अन्नावर मी खूष होतो. एके दिवशी डोळ्याला जणूं शिवलेल्या जड पापण्या अलगद दूर झाल्या. कंठातून ही आवाज फुटायला लागला. अजून आकाशात झेप घेतली नसली तरी गगन मला ठेंगणे वाटू लागले होते. डोळे उघडल्या क्षणापासून डोळ्यात काय,काय साठवून ठेऊ आणि काय नको असे मला होऊन गेले होते.
वाकून,वाकून झाडाच्या बुंध्याचा परिसर बघितला. डोळे ताणताणून तळ्याचा काठ निरखला.
आई बाहेरून आल्यावर मला ही तुझ्या सोबत यायचं म्हणून लाडीक हट्ट धरला. पण आमच्या मासाहेबांनी काही आमचा हा बालहट्ट पुरविला नाही. तो हट्ट पुरवायला ती सुध्दा असमर्थ होती.

मला पंखाने थोपटवत ती माऊली म्हणाली.राजा अजून थोडे दिवस थांब.तुझ्या पंखात बळ आले की मीच तुला उडायला शिकवेन. तुझ्या आधी जन्माला आलेली भावंड बघ आत्ता ,आत्ता कुठे उडायला लागली आहेत.तेव्हा तु उगाच घाई करू नको. मी फुरंगुटून बसलो. मग तिनेच मला बळेबळे अन्न भरविले आणि आम्ही झोपी गेलो. तीन,चार दिवसात मात्र माझ्या पंखात काहीतरी नवचैतन्याचा भास होऊ लागला. हळुहळु जागच्या जागेवर पंखाची उघडझाप करणे मला जमु लागले. हळुहळु जागच्या जागेवर मी टणाटण उड्या मारू लागलो.आईबाबा माझी ही प्रगती बघून खुष होते. एक दिवस भल्या पहाटे अजून उजाडायला अवकाश होता .परंतु आईबाबांची कुजबुज माझ्या कानी पडली.कुजबुजी मधे माझ्या नावाचा उल्लेख आल्याने मी डोळे बंद ठेऊनच कान टवकारले.

तर बाबा आईला म्हणत होते.आज छोट्याला एका फांदी वरून दुसर्या फांदीवर उड्या मारायला शिकवायचा विचार आहे माझा. बाबांचे हे उद्गार ऐकून तर मला लगेच तेथल्या तेथे उड्या मारायची ईच्छा झाली.
पण...दुसर्याच क्षणी मातृह्यदय जागृत झाले. नको,नको अजून एक ,दोन दिवस जाऊ देत.झाले...आईच्या बोलण्या सरशी माझे मन लगेच खट्टू झाले.पण बाबा जरा खेकसलेच आईवर .अग नको काय? त्याला काय नेभळट बनवायचे की काय तुला. त्याची ईच्छाशक्ती प्रबळ आहे. ईतर भावंडांपेक्षा लवकर शिकेल तो. ते काही नाही मी आज नेणारचं त्याला. आईने लगेच सुस्कारा सोडला.बघा बाई तुम्हाला योग्य वाटेल ते करा.मला तर क्षणभर वाटले
बाबांना जाऊन चक्क मिठी मारावी.आता तर केव्हा एकदा सकाळ होते.असे मला होऊन गेले.

झोपेचे सोंग तरी किती वेळ घेणार. तितक्यात बाबांचा आवाज कानी पडला.
काय बच्चु...आज घरट्यातून बाहेर पडणार का? की अजून आईच्या पंखाखाली च बसायचा विचार आहे? बाबांचे वाक्य संपताक्षणीच मी उद्गारलो नाही...नाही बाबा मला यायचय् तुमच्या सोबत. पंखाची थोडीशी उघडझाप मी केली. एक एक पाऊल टाकीत मी ऐटीत बाबांच्या शेजारी येऊन उभा राहीलो. बाबांनी पहिला धडा द्यायला सुरवात केली. आज तु प्रथम या वरच्या फांदी वरून खालच्या फांदीवर पंख पसरून उडी मारायची. झाले पहीली उडी मारलीआणि सारा आसमंत गर्कन माझ्या डोळ्या समोरून फिरला. मी एकदम डोळे गच्च मिटून घेतले.वाटले. झाले आपण आता धाडकन जमीनीवर पडणार. ईतक्यात माझ्या सर्व बहीण भावंडाचा ,आई बाबांचा हर्षोल्लास कानी
पडला.आणि मी डोळे उघडले.

बघतो तर मी व्यवस्थित दुसर्या फांदीवर पोहचलो होतो.त्या एकाच घटनेने माझा आत्मविश्वास जागा झाला. मग दिवसभर मी या फांदी वरून त्या फांदीवर त्या फांदी वरुन या फांदीवर उड्या मारण्यात रंगून गेलो.आईबाबानी जेव्हा आरडाओरडा केला तेव्हाच त्यांनी आणलेले अन्न भरवून घ्यायला मी घरट्यात गेलो. खावून झाल्यावरही माझा उड्या मारण्याचा कार्यक्रम सुर्य मावळे पर्यंत चालू होता. आज स्वप्नातही मी खूप भरार्या मारल्या थेट तळ्यापर्यंत जाऊन तेथील थंडगार पाणी पिऊन आलो. दुसरे दिवशी आईबाबा उठायच्या आत मी जागा झालो.आज कुठला नविन धडा मिळणार म्हणून मी उत्सुक होतो.आज बाबांनी सकाळीच जाहीर केले की आता आज तु वरच्या शेंड्यावरून थेट खालच्या फांदी पर्यंत पंख पसरून झेप घ्यायची. झाले आज दिवसभर माझा तोच उद्योग सुरू होता‌. खालून वर आणि वरून खाली.

माझी चिकाटी बघून लगेच तिसरे दिवशी बाबांनी आला जवळच्या झाडावर झेप घ्यायला लावली.ती झेप ही यशस्वी झाली.आणि मग हळूहळू तळ्याकाठी जाणे,स्वत: चे अन्न स्वत: मिळविणे या सार्या गोष्टीत मी तरबेज झालो.
उन्हाळा जवळ यायला लागला आम्हा पक्षांना युरोपातील हे उन सहन होत नाही म्हणून बाबांनी आज भल्या पहाटे भारतातील भरतपूर या अभयारण्यात आपण स्थलांतरीत होणार आहोत.असे जाहीर केले. 
मी तर अत्यानंदाने वेडापिसा झालो. बाबांनी प्रवासातील खाचाखोचा सर्वांना सांगितल्या. सर्वांनी सोबत कसे रहायचे.,मागे कुणी रेंगाळायचे नाही. वगैरे सुचना दिल्या. इतर ही बरीच नातलग मंडळी आमच्या सोबत होती. एव्हाना शेजारच्या झाडावर राहणारी एक मैत्रिणही मी मिळवली होती. 

आमच्या दोघांमधे प्रेमरज्जु केव्हा ,कसे बांधल्या गेले ते आम्हालाही कळले नाही.परंतु आता ईतके लांब सोबत जायचे म्हणून आम्ही दोघेही खुष होतो.मजल दरमजल करीत आम्ही बरेच दिवसानंतर भरतपूर च्या अभयारण्यात येऊन पोहचलो. तेथील आल्हाददायक हवा,तळ्यातील थंडगार गोड पाणी,सगळीकडे दाटलेली हिरवळ.हे सारे
सृष्टीसौंदर्य बघून आम्ही सारेच हरखून गेलो. मौजमस्तीत आला दिवस जात होता.
आणि......आणि माझ्या आयुष्यातील तो काळा दिवस उगवला.भरतपुरचे अभयारण्य पहायला आलेल्या एका छोट्या मुलाने सार्या ची नजर चुकवून गलोली मधे एक दगड ठेऊन माझ्या वर नेम धरला होता.मी प्रियाराधनात मग्न होतो. ईथे पक्ष्यांना अभय असल्याने असा काहीप्रसंग माझ्यावर ओढवेल याची मला जाणीव ही नव्हती. दगडाचा फटका माझ्या पंखला बसताच मी बेशुध्द होऊन खाली कोसळलो.शुध्दीवर येताच बघतो तर काय ?माझ्या अवतीभोवती माझे सगेसोयरे ,बहीण भावंड,प्रेयसी,आईबाबा शोकाकुल मनस्थितीत रेंगाळत होते.

मी पंख उचलून उघडझाप करण्याचा प्रयत्न केला.परंतु पंख तसूभरही हलला नाही.मात्र वेदनेची एक तिव्र लहर माझ्या मस्तकाला चाटून गेली. तेथे असेपर्यंत माझे आईबाबा मला परत अन्न भरवित होते.लिली माझ्या जखमांची काळजी घेत होती. हळूहळू सार्याची कुजबुज वाढू लागली.कुणी स्पष्ट काय ते मला सांगत नव्हते.मी एक,दोनदा लिलीला विचारून बघितले.की सारे जण माझ्या कडे बघून काय कुजबुजतात. तेव्हा तिच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला. तो ऐकून मी चपापून गेलो. तिला खोदून,खोदून विचारले तेव्हा ती हळूच बोलली. भरतपूर ला आता हळूहळू उन्हाळा सुरू होतो आहे. तो दाह आपल्याला सहन होणार नाही. म्हणून आपल्या मायदेशी परत जावे लागणार आहे. परंतु ईतक्या दुरचे अंतर तुझ्या दुखर्या पंखाने तुला पार करणे शक्य नाही तुला सोडून जावे लागणार म्हणून सारे कासाविस झाले आहेत. यापुढे एकटे असहाय्य स्थितीत जीवन कंठावे लागणार हे दारूण सत्य डोळ्या समोर आल्या बरोबर मी अस्वस्थ झालो.

त्याच मनस्थितीत बोलून गेलो लिली...लिली तु सुध्दा मला सोडून जाणार.भावना वेगात बोलून तर गेलो.पण नंतर माझाच मला पश्चाताप झाला. काय अधिकार आहे मला तिच्या जीवनाचे दान मागायचा.कारण मी ही तर काही दिवसाचाच सोबती. आदित्य राजाच्या तेजोवलयात होरपळून तरी मरणार.नाहीतर पक्षीराज गरूडाचे भक्ष्य तरी होणार. माझ्या मृत्युनंतर तिच्याच जीवाची ससेहोलपट होणार.तिचाही चेहरा वेदनेने झाकोळून गेला.
ती तर मला सोबत करायला तयार होती.परंतु तिचे आप्तस्वकीय या गोष्टीला तयार नव्हते. शेवटी तो दिवस उगवला स्थलांतरणाचा....
येण्याच्या वेळी किती उत्साहात होतो मी. पण आज....आजची मनोव्यथा व्यक्त करणे कठीण आहे.जाण्याच्या वेळी प्रत्येक जण माझ्या जवळ येऊन माझा निरोप घेऊन जात होता.

आई बाबांनी चार,पाच दिवसाचे अन्न माझ्या जवळ आणून ठेवले. लिलीने प्रेमानेजखमेवरून पंख फिरवला.तो स्पर्श अजूनही मी माझ्या मर्मबंधात जपून ठेवला आहे. आईबाबा किंवा लिली यांना अडवून तरी काय उपयोग माझे भवितव्य माझ्याच काय त्यांच्या ही डोळ्या समोर उभे आहे.
आता माझ्या आयुष्यातील त्या शेवटच्या जीवघेण्या क्षणाची वाट बघत बसलो होतो.तर तुमच्या मायेच्या हस्तस्पर्शाने माझी जीवनकहाणी मूर्तिमंत माझ्या नजरे समोर उभी राहीली.
ही sand पायपर या पक्ष्याने न सांगितलेली कहाणी परंतु त्या ला हाताच्या ओंजळीत ठेवता क्षणी
मला जाणवलेली त्याची व्यथा माझ्या डोळा पाणी घेऊन आली...
समाप्त.
©® डॉ.मधुलिका महाजन.

सदर कथा लेखिका डॉ.मधुलिका महाजन यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

धन्यवाद.!!!

📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने