नवऱ्याचे श्राद्ध

 


नवऱ्याचे श्राद्ध

©®अर्चना अनंत ✍️


रेवा अगदी पहाटेच उठली होती. तिने आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती.

सासूबाई आणि राज उठेपर्यंत जवळपास सगळाच सयंपाक झाला होता. 

आज अक्षयतृतीया होती. राजला सुट्टी नव्हती म्हणून दहा वाजेपर्यंत सगळं आवरायला हवं म्हणून आदल्या दिवशीच सासूबाईला सगळं विचारून ठेवलं होतं.  

तसं रेवला सगळं माहिती होतं परंतु लग्नानंतरचा पाहिलंच सण होता आणि प्रत्येक घरी वेगळे रितिरिवाज असतात त्यामुळे विचारून घेतेलेले बरे असा वीचार रेवाच्या मनात आला.

सासूबाई, आंघोळ करुनच स्वयंपाक घरात आल्या.

अन्नाचा घामघमाट पसरला होता. साटळ्या , अळूवडी, वडे, भजी, पापड, या विशिष्ट पदार्थाखेरीज वरण, भात, दोन भाज्या, कढी तयार होती. जवसाची चटणी, डाळीची चटणी, काकडी टोमॅटो कोशिंबीरची भांडी डायनिंग टेबलवर तयार होती.

"अगं रेवा, काही मदत करू का?"सासूबाई आत येत कणिक मळणाऱ्या रेवला म्हणाल्या.


तितक्याय मुलं धावत आली. सात वर्षाचा वर्षाचा रुद्र आणि आठ वर्षाची आरुषी.


"नको आई, झालंच सगळं. तुम्ही बसा हॉलमध्ये मुलांकडे बघा. मी चहा आणते तुमच्यासाठी"


रेवाने मुलांसाठी दूध आणि सासूबाई आणि राजसाठी चहा नेला.


राज फोटो साफ करीत होता. चहा घेण्यासाठी म्हणून हातातील फोटो ठेवले आणि चहा घेतला. 

फोटो पाहून रेवाला फार वाईट वाटत होते. ती शांतपणे किचनमध्ये गेली आणि पोळ्या करू लागली.

साडेनऊपर्यंत सगळा स्वयंपाक झाला होता. वाढायची तयारी करुन भांडी डायनिंग टेबलवर काढून ठेवली .... ओटा आवरून ती हॉलमध्ये आली.  

बाजूला देवघरात पूजेची तयारी सुरु होती. 

दोन फोटो टेबलावर ठेवले होते. बाजूला पूजेची थाळी, हार घेऊन सासूबाई उभ्या होत्या.

तिला फार भरून येत होतं...

"आई, मला बरं वाटत नाही, तुम्ही नैवाद्याची ताटं वाढून घ्याल का?" बोलताना डोळ्यातून अश्रू गालावर आले.

"काय झालं रेवा, बरं नाही का?तिच्या जवळ येत सासूबाई म्हणाल्या "जा आराम कर. मी करते बाकीचे काम"

रेवा बेडरूममध्ये गेली आणि बेडवर अंग टाकून रडू लागली. "श्री,मला माफ कर, अरे तुझ्या ऋणात आहे रे, तरी बघ मी आज तुला जेवायला नाही देऊ शकत. श्री मला माफ कर मी हतबल आहे."

रडता रडता तिला तिचा भूतकाळ आठवू लागला.


साधारणता नऊ वर्षापूर्वी श्री आणि रेवाचे लग्न झाले होते. 

श्री सरकारी नोकरीवर, उच्च पदावर कार्यरत होता. 

वर्षभरात आरुषीचा जन्म झाला. 

श्री एकुलता एक मुलगा, वडील लहानपणीच वारलेले, आई, श्री आणि रेवा.. बस एवढंच त्यांचं कुटुंब.  

रेवा खूप आनंदी होती. आरुषी श्रीचा जीव की प्राण होती.

आरुषीचा पाचवा वाढदिवस होता... श्री केक आणायला जात होता.

श्रीची आई म्हणाली, अरे श्री मी पण येते मला माझं ब्लाउज आणायचं आहे. 

अर्ध्या तासात येतो म्हणून गेलेले, दोन तास झाले तरी आले नाही...  

रेवा आणि आरुषी वाट पाहून दमल्या. दोघेही फोन उचलत नव्हते. 

तितक्यात पोलिसांचा फोन आला आणि रेवाच्या पायाखालची जमीनच सरकली... 

जोरदार अपघात झाला होता त्यात दोघा मायलेकांचा मृत्यू झाला होता.

पाच वर्षात रेवा विधवा झाली..

जगायला भरपुर पैसा सोडून गेला होता श्री.

त्याच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी पण मिळाली होती रेवाला. पॉलिसीचे पन्नास लाख मिळाले होते.

रेवा आता एकटी राहत असे. वर्षश्राद्ध,अक्षय तृतीया आणि सर्वपितृमोक्ष अमावस्येला श्रीचं पान वाढीत होती.

रेवाची आई म्हणायची, "अगं कशाला अडकतेस बंधनात. उद्या लग्न झालं तर नाही करू शकणार तू हे सगळं"

"आई, एकतर मी दुसरं लग्नच कारणार नाही आणि आई, अगं तो एवढी प्रॉपर्टी माझ्या नावे सोडून गेला आणि त्याला मी उपाशी ठेऊ? माझं मन नाही मानत आई. त्याची मुलगी आहे ती करेल त्याचं श्राद्ध. तसंही आजकाल मुली सगळं करतात."

ती दुसऱ्या लग्नाला तयार नव्हती...आईवडील खूप मागे लागले होते लग्नासाठी.

\पहिल्या लग्नाच्या वेळी जेवढी स्थळं आली नसतील तेवढी स्थळ येत होती रेवाला.. कारण आता रेवला नोकरी, मोठं घर आणि पॉलिसिचे लाखो रुपये होते.

लग्न करावं की नको अशी मनाची घालमेल सुरु होती.. कारण सगळी स्थळं तिच्या प्रॉपर्टीला पाहून येत होती... अशातच राजच स्थळ आलं.  

बायको कँसरने गेलेली, सहा वर्षाचा मुलगा आणि म्हातारी आई.

पहिल्याच भेटीत मुलाने तिला मम्मी म्हणून हाक मारली आणि धावत रेवाकडे आला.

राजच्या पहिल्या बायकोत आणि रेवामध्ये काही साम्य होतं...

मम्मी , म्हणून जवळ आला आणि लगेच दूर झाला. 

त्याला कळून चुकलं होतं की ही आपली आई नाही.

त्याच्या चेहऱ्यावरील ते दुःखी भाव पाहून रेवाने ठरविले की आपण त्याची आई व्हायचं..

श्रीच्या मृत्यूनंतर जवळपास चारवर्षाने ती लग्न होऊन राजची बायको झाली.

रुद्र त्याच्या आईबाबाला मम्मी पप्पा म्हणायचा.

त्यामुळे आरुषी राजला पप्पा म्हणू लागला आणि रुद्र रेवाला आई.

आज आपण श्रीचं श्राद्ध नाही घालू शकत म्हणून तिला फार वाईट वाटत होतं.

म्हणावं का राजला? नाही... आजपर्यत समाजाने स्त्रीच्या पहिल्या नवऱ्याचे श्राद्ध घालू द्यायची परवानगी दिली नाही. 

मुलीला आईवडिलांचे श्राद्ध घालण्याचा अधिकार नाकारतात तर पहिल्या नवऱ्याचे श्राद्ध .. फार लांबची गोष्ट आहे... 

आपण सहज जरी विचारलं तरी म्हणेल हिच्या मनात पहिल्या नवऱ्याचं प्रेम आहे..  

वेगळाच विचार करतील.

राज आपल्या पहिल्या बायकोचं श्राद्ध घालू शकतो पण मी नाही.... का? तर मी एक स्त्री आहे म्हणून...तिच्या मनाची घालमेल सुरु होती.


तिकडे देवघरात सासूबाईने आपल्या पहिल्या सुनबाईच्या आणि रेवाच्या सासऱ्यांच्या फोटोसमोर दोन पानं वाढली.


"हे बघ, आज माझ्या मम्मीला जेवायला दिलं "छोटा रुद्र आनंदाने आरुषीला म्हणाला.


"हो रे, मागच्या वर्षी माझ्या आईने पण माझ्या बाबाला जेवायला दिलं होतं.दरवर्षी द्यायची.यावर्षी नाही दिलं. माझा बाबा उपाशीच राहील का रे?


"तूझ्या बाबाला आई असेल ना? ती देईल जेवायला".


"नाही रे, माझ्या बाबाला कुणीच नाही.माझी आजी पण देवाघरी गेली.मी आणि आईच आहोत फक्त"


मुलांचं संभाषण एकूण दोघे माय लेकं एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले...


"राज किचनमधे चल" असं म्हणत आई राजला आतमध्ये घेऊन गेली.


"अरे रेवा का इतकी डिस्टर्ब् आहे कळलं तुला? तुला काही अडचण नसल्यास आपण आरुषीच्या बाबांचं एक पान वाढू?"


"अगं आई मला कसलीच अडचण नाही.. रुद्रच्या आईचं स्थान जर माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात अबाधित आहे तर आरुषीच्या बाबांचं स्थान रेवाच्या हृदयात का असू नये? आई तू वाढ पान मी फेसबुकवर एखादा फोटो बघतो श्री चा...


टेबलावर नैवाद्याचे तीन पानं सजली होती.. हारामधील दोन फोटोमधे फुल वहिलेला श्रीचा फोटो असलेला मोबाईल ठेवला होता..


रेवा, चल पानाला नमस्कार करायला ये, राज बेडरूम मधे तिला आवाज द्यायला गेला.


डोळे पुसून, चेहरा धुवून ती बाहेर आली... तीन पानं आणि श्रीचा फोटो पाहून तिला गहिवरून आलं...


आई..... खूप धन्यवाद एवढंच ती बोलू शकली..


"रेवा, अगं आपल्या माणसाला मनात जपायचं असतं.. तू आम्हा सगळ्यांना आपलं मानलंस... मग आम्ही पण तुझं मन, तूझ्या भावना जपायला नको... जा पूजा कर आणि नमस्कार कर"


तिला फोटोतून श्री हसल्याचा भास झाला..


"बघ रुद्र माझे बाबा पण जेवतात"छोटी आरुषी रुद्रला आनंदाने सांगत होती.


"पप्पा, माझ्या बाबांचा पण रुद्रच्या मम्मी सारखा मोठा फोटो करुन आणाल ना?आरुषी राजला म्हणाली.


हो बेटा, असं म्हणत राजने रुद्र आणि आरुषीला पोटाशी धरलं...


" तुझ्या लेकीला बापाचे प्रेम मिळेल रे अशी मला खात्री आहे"श्रीच्या फोटोकडे पाहत डोळ्यातील अश्रू पुसत रेवा मनात म्हणाली.


@अर्चना अनंत ✍️
 सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव असून शेअर करायची असल्यास नावासहित करावी.  

2 टिप्पण्या

 1. कथा खरचचं खूप सुंदर आहे का?


  पण सध्याच्या काळात इतक्या सुंदर मनाची लोकं आहेत का?
  राहून राहून प्रश्न पडतात.
  कारण घरातील बायकोचे तरी मन जपले जाते की नाही अशी शंकाच आहे..................

  उत्तर द्याहटवा
 2. खूप सुंदर. असा विचार प्रत्येक घरात व्हायला हवा

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने